लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया…

लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया…

जगभरात मंदीचे पडघम वाजू लागले आहेत. भारताच्या दृष्टीने ते लांबून येणार्‍या आवाजासारखे असले तरी, मंदी कधी उंबरठ्यापर्यंत येईल, ते सांगता येणार नाही. कोरोनानेदेखील असा सहज प्रवेश केला होता. या मंदीमागे जी काही कारणे आहेत, त्यापैकी कोरोना हे सुद्धा एक कारण होते. कोरोना काळात उद्योगधंदे बंद झाले होते. त्यावेळी अनेकांना नोकरी गमवावी लागली होती. आताही मंदीच्या कारणावरून कर्मचारी कपात सुरू झाली आहे. फिलिप्स, ट्विटर, फेसबुक, अ‍ॅमेझॉन यासारख्या बड्या कंपन्यांनी कॉस्ट-कटिंग सुरू केले आहे. बड्या कंपन्यांची ही अवस्था तर छोट्या कंपन्यांचे काय? महागाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना आता नोकर्‍यांवरही गदा येऊ लागली आहे. पुढचा नंबर आपला येतो की काय, अशी भीती अनेकांच्या मनात आहे.

सर्वसामान्यांची अशी ससेहोलपट सुरू असताना राजकारणी आपल्याच शह-काटशहच्या डावपेचात मग्न आहेत. राज्याचे राजकारण तर सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे गेले आहे. कोणत्याही विषयावरून वादंग निर्माण केला जातो. असे चित्र उभे केले जाते की, या प्रश्नाशिवाय दुसरा मोठा प्रश्न असूच शकत नाही. बहुतांश राजकारण्यांनी तर टीका करताना भाषेची पातळी सोडली आहे. या सर्व कोलाहलात खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. गेल्या ७ सप्टेंबर २०२२ ला तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून या ‘भारत जोडो यात्रे’ला प्रारंभ झाला. १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून प्रवास करत जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल. सकाळी सहा वाजता या यात्रेला सुरुवात होते. दररोज दोन टप्प्यांत २० ते २५ किलोमीटरचे अंतर पार केले जाते.

या यात्रेत काँग्रेस नेत्यांच्या हाती पक्षाचा झेंडा नाही तर, तिरंगा पाहायला मिळतो. एकूण १५० दिवस आणि सुमारे ३५०० किलोमीटर ही यात्रा चालेल. ‘एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए तो जुड़ जाए अपना वतन’ असे सांगत ‘मिले कदम, जुडे वतन’ असे घोषवाक्य काँग्रेसने दिले आहे. जवळपास पाच महिने चालणार्‍या या भारत जोडो यात्रेत कायम ३०० यात्री असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. या यात्रेत तीन प्रकारचे यात्री आहेत. १०० ‘भारत यात्री’ आहेत, जे सुरुवातीपासून समारोपापर्यंत म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सहभागी असतील. तर, ज्या राज्यांतून ही यात्रा जाणार नाही, त्या राज्यांतील १०० यात्री असतात आणि ते ‘पाहुणे यात्री’ म्हणून ओळखले जातात. तर, ज्या राज्यांतून ही यात्रा जाते, तेथील १०० ‘प्रदेश यात्री’ असतात.

बरोबर दोन महिन्यांनी या यात्रेने गेल्या सोमवारी तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश केला. शनिवारपर्यंत या यात्रेने सहा राज्यांच्या २८ जिल्ह्यांतून प्रवास केला आहे. तर, २० नोव्हेंबरला ही यात्रा मध्य प्रदेशात जाईल. यादरम्यान ही यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून ३८२ किलोमीटरचे अंतर पूर्ण करेल. राहुल गांधी यांची आता १८ नोव्हेंबरला बुलडाण्यात सभा होणार आहे. भाजपाने पप्पू’ म्हणून हिणवलेल्या राहुल गांधी यांच्या या भारत जोडो’ यात्रेला कितपत प्रतिसाद मिळतो, याचा अंदाज फारसा कुणाला नव्हता. त्यामुळे किरकोळ कारणावरून भाजपाने राहुल गांधी आणि काँग्रेसला सुरुवातीला लक्ष्य केले. नॅशनल हेराल्ड मनी लॉण्ड्रिंग प्रकरणातून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याची टीकाही भाजपाने केली. पण याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांनी आपली भारत जोडो’ यात्रा सुरूच ठेवली. ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल, मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ या मजरूह सुलतानपुरी यांच्या ओळी सार्थ करणारे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. त्यांचे मुलांबरोबर धावणे, वयस्कर-वृद्ध महिलांनी त्यांच्या गालावरून प्रेमाने हात फिरवणे, सेलिब्रिटींनी त्यांच्याबरोबरीने पावले टाकत मार्गक्रमण करणे ही सर्व दृश्यं याचीच द्योतक आहेत.

या यात्रेदरम्यान गांधी परिवाराबद्दल असणारे आकर्षण आणि कुतूहल पदोपदी दिसते. इंदिरा गांधी यांचे राजकारण वादग्रस्त ठरले असले तरी, त्यांच्या करारीपणाची वाखाणणी विरोधकांनीही केली आहे. यामुळे जनमानसातही त्यांची तशी प्रतिमा होती. त्याचाही थेट लाभ राहुल गांधी यांना होत आहे. या पदयात्रेदरम्यान सर्वसामान्यांची, विशेषत: वयस्कर व्यक्तींची सुरू असलेली धडपड पाहिली की, हे लगेच लक्षात येते. राहुल गांधीदेखील खुद्द तिथे जाऊन किंवा त्यांना जवळ बोलावून त्यांच्याशी संवाद साधत आहेत.

या सर्व कारणांस्तव राहुल गांधी यांची ही यात्रा सोशल मीडियावरही चर्चेचा मोठा विषय ठरू लागली आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करण्यात माहीर असलेल्या भाजपा आणि त्याच्या शीर्षस्थ नेत्यांच्या दृष्टीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी दखल तशी अनपेक्षित होती. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर काँग्रेसने काय धडा घेतला, असा प्रश्न उपस्थित झाल्यास ‘इव्हेंट मॅनेजमेन्ट’ हे उत्तर देता येईल. कन्याकुमारी ते श्रीनगर अशा या यात्रेचे नियोजन काँग्रेसकडून केले गेले. त्यातही राहुल गांधी यांची यासाठी मनोभूमी तयार केली गेली. त्यांना व्यवस्थितपणे प्रोजेक्ट करण्यात येत आहे. याचा अंदाज बहुदा भाजपाला आला नाही.

टीका-टिप्पणी होत असतानाही राहुल गांधी यांची ही यात्रा सुरूच आहे. ज्या राज्यांत त्यांची ही यात्रा असते, तिथे ते जाहीर सभाही घेतात. आपण ही यात्रा का आयोजित केली, याचे कारण राहुल गांधी यांनी सांगितले आहे. सरकारला प्रश्न विचारू शकतो, असे ठिकाण म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा! पण दोन्ही सभागृहांमध्ये आम्ही बोलत असताना् माईक ऑफ केला जातो. त्यामुळे आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. दुसरे माध्यम म्हणजे मीडिया. त्याद्वारे आम्ही जनतेशी संवाद साधू शकतो. पण माझे पत्रकार मित्रही हतबल आहेत. मीडिया हाऊसचे लगामही दुसर्‍यांच्या हातात आहेत. त्यामुळे आमच्याकडे आता हाच मार्ग उरला होता. लोक ज्या रस्त्यावरून जातात, त्याच रस्त्यावर अशी पदयात्रा काढून एकमेकांशीं संवाद साधायचे ठरवले, असे राहुल गांधी यांनी अशाच एका जाहीर सभेत स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, हे सांगतानाच आपल्या या यात्रेला पुरेसे फुटेज मिळत नसल्याकडेही त्यांनी अप्रत्यक्षपणे अंगुलीनिर्देश केला. त्यामुळेच राज्यात ही यात्रा सुरू असताना घडत असलेल्या घडामोडींचा संबंध याच्याशी जोडला गेला. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे, चित्रपटातील इतिहासाच्या होणार्‍या विपर्यासाला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेणे, ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून राष्ट्रवादी आणि मनसे आमने सामने येणे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची १०२ दिवसांनी जामीनावर सुटका अशा घटना गेल्या आठवडाभरात राज्यात घडल्या. ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी अशा घटना घडल्या किंवा घडवल्या गेल्या का, असा प्रश्न उपस्थित केला गेला. पण तो पूर्णपणे निरर्थक वाटतो. उलट, महाराष्ट्रातील जनतेला यामुळे एक वेगळा विषय पाहायला आणि चर्चेला मिळाला, असे म्हणता येईल.

पण काँग्रेसला यामुळे ‘अच्छे दिन’ येणार का, ही खरा कळीचा मुद्दा आहे. या यात्रेत काँग्रेसला काही अंशी फायदा होईल, यात दुमत नाही. कारण काँग्रेस कात टाकत आहे, असे लोकांसमोर आणण्याचे आटोकाट प्रयत्न आहेत. ही भारत जोडो यात्रा हा जसा त्याचाच एक भाग आहे, तसेच काँग्रेसमध्ये अलीकडे झालेली अध्यक्षपदाची निवडणूकही होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडले होते. त्यामुळे सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष बनल्या. तथापि, अध्यक्षपदाची सूत्रे गांधी परिवाराव्यतिरिक्त अन्य नेत्याला सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले. तर, पक्षांतर्गत सुधारणांची मागणी करणार्‍या जी-२३ गटाचे शशी थरूर या निवडणुकीत पराभूत झाले. ते विजयी झाले असते तर, ‘देश के साथ काँग्रेस भी बदल रही है’ असे म्हणता आले असते.

२००१ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक झाली होती. त्यात सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या. तर, सीताराम केसरी (१९९७) यांच्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे ही गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती पक्षाध्यक्षपदावर विराजमान झाली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांची गांधी घराण्याचे एकनिष्ठ म्हणून ओळख असल्याने पक्षावर पकड ही गांधी घराण्याचीच राहणार आहे, हे स्पष्ट आहे. भाजपाने निवडणुकीपूर्वीच म्हटले होते की, ‘निवडून येणारा अध्यक्ष हा गांधी कुटुंबाची कळसूत्री बाहुली असेल.’ काँग्रेसवर भाजपाने नेहमीच घराणेशाहीचा आरोप केला आहे. वास्तवात, ‘घराणेशाही’ हा शब्द वगळला तर, भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची स्थिती सारखीच आहे. मल्लिकार्जुन खर्गेंच्या माध्यमातून गांधी कुटुंब पक्षाचा कारभार चालवणार, असा भाजपाचा दावा असला तरी, भाजपामध्ये तरी कुठे चित्र वेगळे आहे. तिथेही जे. पी. नड्डा हे नामधारी असल्याचेच दिसते. सर्व सूत्रे मुख्यत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच हलवित असल्याचे पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर खर्गे आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत काय प्रभाव पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेकडे पाहिले जात आहे. राहुल गांधी हे उत्कृष्ट वक्तृत्वपटू नाहीत, याचेच भांडवल भाजपाकडून केले जात आहे. पण नेतेपदासाठी हाच एक निकष नसतो. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उथळपणा बाजूला ठेवून त्यांनी आता जास्त प्रगल्भता दाखविण्याची गरज आहे. ‘भारत जोडो’ यात्रा ही एक संधी आहे. ती अतिशय जागरुकतेने साधली तरच, ही यात्रा फळास आली म्हणता येईल. अन्यथा, ‘स़िर्फ इक क़दम उठा था ग़लत राह-ए-शौक़ में, मंज़िल तमाम उम्र मुझे ढूँढती रही…’

First Published on: November 13, 2022 11:00 PM
Exit mobile version