उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?

उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?

राजकारणात असलेल्या कोणत्याही नेत्याने आणि अगदी कार्यकर्त्यानेदेखील सदैव अष्टावधानी असावे लागते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे मुळातच करिष्माकारी नेतृत्व होते. बाळासाहेब ठाकरे या नावातच मराठी माणसाला सदैव सळसळत्या ऊर्जेचा लाभ मिळत असे. बाळासाहेब हयात असतानाच प्रारंभी शिवसेना कार्यकारी प्रमुख म्हणून व नंतर पक्षप्रमुख म्हणून त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. वास्तविक बाळासाहेब हयात असतानाच उद्धव ठाकरे हे जर अत्यंत जबाबदारपणाने वागले असते तसेच बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर अत्यंत गांभीर्याने घेतली असती तर आज जी अवस्था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची झाली आहे ती त्यांना निश्चितच टाळता आली असती. अगदी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा अल्पसा कालावधी वगळला तर ३१ जून २०२२ पर्यंत उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. (Shiv Sena Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Election Commission CM Eknath Shinde)

अडीच वर्षे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. खरेतर कोणत्याही राजकीय पक्षासाठी त्या पक्षाचा प्रमुख राज्याच्या सर्वोच्च सत्तास्थानावर असणे हा त्या राजकीय पक्षाच्या संघटन बांधणीसाठी तसेच संघटन विस्तारासाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी सुवर्णकाळ समजला जातो, मात्र दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरदेखील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीकडे आणि विस्ताराकडे लक्ष दिले नाही. कोरोना हा काही केवळ महाराष्ट्रात शिवसेनेसाठीच होता असे नाही तर तो अन्य सर्वच राजकीय पक्षांनादेखील होताच, मात्र या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि अगदी रसातळाला गेलेली काँग्रेस सत्तेच्या बळावर मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेच्याही पुढे गेली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना खरेतर त्यांच्या चाणक्यांनी धोक्याची घंटा वाजवून दाखवण्याची गरज होती, तथापि उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या कोंडाळ्याने नेतृत्वाची भलामण करण्यातच धन्यता मानली आणि इथेच उद्धव ठाकरे यांचा घात झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, सत्ता येते आणि सत्ता जाते, मात्र सत्तेला लाथ मारण्याची हिंमत ही एकट्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती. ही हिंमत जर का उद्धव ठाकरे यांनी दाखवली असती तरीदेखील शिवसेनेची जी शकले आज झाली आहेत ती झाली नसती.

शिवसेनेत जेव्हा उद्धव ठाकरे यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केले गेले, त्यानंतर शिवसेनेचे अत्यंत फायर ब्रँड नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेला सोडून काँग्रेसवासी झाले. राणे यांच्यानंतर शिवसेनेतील घरातील नेतृत्व राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली. त्याचा फटका शिवसेनेला बसला. शिवसेनेच्या नेत्यांना तसेच उद्धव ठाकरे यांनादेखील त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे हे त्यांच्या राजकीय वाटचालीतील नेहमीच स्पर्धक वाटले, मात्र राज ठाकरेंनी मूळ शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही, पण जे राज ठाकरे यांनी केले नाही ते उद्धव ठाकरे यांच्याच आशीर्वादाने मोठे झालेल्या ठाणेकर एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले. उद्धव ठाकरे यांना ज्यांची भीती वाटत होती ते राज ठाकरे बाजूलाच राहिले आणि एकनाथ शिंदे आमदार, खासदारांसह शिवसेना घेऊन निघूनही गेले.

ज्या राजकीय पक्षाचा प्रमुख सहा महिन्यांपूर्वी या राज्याच्या प्रमुख सर्वोच्च सत्तास्थानी असतो त्या राजकीय पक्षाची सत्ता जाताच अवघ्या सहा महिन्यांत एवढी दारुण अवस्था व्हावी हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील बहुदा एकमेव उदाहरण असावे. मुळात स्वपक्षातील बंडाळीने उद्धव ठाकरे यांच्यासारख्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख असलेल्या नेतृत्वाचे सरकार पडणे ही तर मोठी नामुष्की आहेच, मात्र त्याहीपेक्षा मोठी लज्जास्पद बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल ४० निवडून आलेले आमदार आणि डझनभर खासदार त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री हे जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत, गुवाहाटी, गोवा येथे जातात यासारखी दुसरी नामुष्की उद्धव ठाकरे यांच्यासाठी असू शकत नाही. त्यातही उद्धव ठाकरे हे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसेच शस्त्रक्रिया झाल्यामुळे काहीसे गाफील राहिले असं म्हणता येऊ शकेल, मात्र मग शिवसेनेचा पुढचा वारसा सांगणारे युवराज आदित्य ठाकरे हे शिवसेनेत एवढं सारं घडत असताना नेमके काय करत होते? उद्धव ठाकरे यांच्या कोंडाळ्यातील नेते कुठे होते? उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत आणि देशभर गाजलेले पीए मिलिंद नार्वेकर कुठे होते? का ही सर्व मंडळी केवळ शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या सत्तापदांभोवतीच सदैव घुटमळलेली राहिली का?

निष्ठावंत शिवसैनिकांच्या वर्षानुवर्षांच्या या प्रश्नांची उत्तरं पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यापुढे तरी कधी देणार आहेत का? राजकीय पक्ष म्हटला अथवा सामाजिक संघटना म्हटली की अंतर्गत कुरबुरी, आपापसातील हेवेदावे, सत्तास्पर्धा हे ओघानेच आले, मात्र आपापसातील या हेव्यादाव्यांचा दूरगामी परिणाम पक्ष संघटनेवर होऊ न देण्यासाठी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्या त्या वेळी नेमकी कोणती भूमिका बजावली? शिवसेनेसारख्या अत्यंत निष्ठावंत कडवट संघटनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेतृत्व हे काही एका रात्रीमध्ये उभे राहत नसते.

ठाणे जिल्ह्यातील लाखो शिवसैनिकांनी व मराठी माणसांनी आज एकनाथ शिंदे यांच्यासारख्या एका सामान्य रिक्षाचालकाला राज्याच्या सर्वोच्च सत्तास्थानी अर्थात मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अत्यंत कडवट निष्ठावंत शिवसैनिकावर एवढे टोक गाठण्याची वेळ का यावी याचे उद्धव ठाकरे यांनी चिंतन करण्याची गरज आहे. सत्तेच्या स्पर्धेत आहेत म्हणून स्वत:च्या बरोबरीच्या सहकार्‍यांना सदैव दाबत आणि चेपत राहिल्याने सत्ता टिकवता येत नसते. कारण अशा दाबल्या गेलेल्या नेतृत्वाचा योग्य संधी मिळताच स्फोट होऊन एकनाथ शिंदे होत असतो. आज जे भक्कम पाठबळ एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे देत आहेत तेच पाठबळ शिवसेनेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना का देऊ शकले नाहीत?

शिवसेना नेतृत्वाची सर्वात मोठी घोडचूक जर कोणती असेल तर २०१४ नंतर देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा जो पोत बदलला, जी दिशा बदलली ती नीट समजून घेण्यात शिवसेनेचे नेते कमी पडले आणि त्याहूनही सर्वात मोठी चूक म्हणजे ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील आणि परदेशातील जनतेने डोक्यावर घेतले त्यांना शिवसेनेने सदैव पाण्यात पाहिले. २०१९ मध्ये ज्या शरद पवारांचे बोट धरून उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसले त्या शरद पवारांनी त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीमध्ये दिल्लीतील सत्तेशी कायम सलोखा राखला आणि उद्धव ठाकरे यांनी मात्र दिल्लीतील भाजप सत्ताधीशांशी कायमचा पंगा घेतला. शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती ही जर हिंदुत्वाच्या वैचारिक भूमिकेवर आधारलेली होती तर मग या दोन्ही पक्षांमधील वैचारिक हिंदुत्व आज गेले कुठे, असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पडला तर त्यात आश्चर्य काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले बंड चुकीचे की बरोबर? उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर बदला घेतल्याची व्यक्त केलेली भावना चूक की बरोबर? शिवसेनेतील बंडाला भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे मिळालेले पाठबळ योग्य की अयोग्य? २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपबरोबर युतीत लढवून मग मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीशी उद्धव ठाकरे यांनी केलेली आघाडी चूक की बरोबर? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला तर हवीच आहेत आणि लोकशाहीमध्ये अशा प्रश्नांची उत्तरे ही केवळ निवडणुकीच्या माध्यमातून मिळत असतात. त्यामुळे आगामी निवडणुकांपर्यंत वाट पाहणे हेच लोकशाहीतील सर्वसामान्य मतदारांच्या हातात आहे, मात्र राजकीय पक्षांमधील या भांडणामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणसाची नाळ ज्या शिवसेनानामक संघटनेशी जुळलेली होती तो सर्वसामान्य मराठी माणूस मात्र या सर्व घडामोडींमुळे अत्यंत निराश आहे, याची नोंद सर्वच राजकीय पक्षांनी घेण्याची गरज आहे.

First Published on: February 20, 2023 10:05 PM
Exit mobile version