सिलिकॉन बँक बुडी आणि मंदी हे एरंडाचे गुर्‍हाळ!

सिलिकॉन बँक बुडी आणि मंदी हे एरंडाचे गुर्‍हाळ!

सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत गेल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, ही बाब खरी आहे, परंतु या बँकेच्या बंद पडण्याने संपूर्ण अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रावर मोठा परिणाम जाणवेल, अशी कोणतीही शक्यता सध्यातरी दिसत नाही. अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रावरच जर याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाही, तर यावरून टोक गाठत थेट जागतिक मंदीची चर्चा करणे म्हणजे हा अतिशयोक्तीचाच प्रकार आहे. या बँकेच्या दिवाळखोरीत जाण्याने जे नुकसान झाले आहे ते सर्वाधिक टेक कंपन्या (आयटी), हेल्थकेअर (आरोग्य) आणि नवीन उपक्रमांचे (स्टार्ट अप) झाले आहे. सिलिकॉन व्हॅली बँक ही माहिती तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रांतील कंपन्या आणि स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य पुरवायची.

बँकेचा सुमारे ४४ टक्के व्यवसाय टेक आणि हेल्थकेअर कंपन्यांकडे होता. त्यामुळे या क्षेत्रातील काही गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. याव्यतिरिक्त इतर क्षेत्रांवर या बँकेच्या बंद पडण्याचा फारसा परिणाम जाणवलेला नाही. सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील १६ वी सर्वात मोठी बँक आहे. या बँकेपेक्षाही अनेक मोठ्या बँका अद्यापही सुस्थितीत असल्याने अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रावर याचे कोणतेही मोठे परिणाम जाणवणार नाहीत. बँक बंद पडण्यामुळे काही गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, हे खरे असले तरी यामुळे संपूर्ण अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत येईल, अशी कोणतीही शक्यता सध्यातरी दिसत नाही. अमेरिकेसारखा देश आपली बँक दिवाळखोरीत जाण्यापासून वाचवू शकला नाही.

गुंतवणूकदार आणि कंपन्यांचे पैसे वाचविण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. लवकरच याचे परिणामही दिसून येतील, असा दावा तेथील सत्ताधारी करत आहेत. सत्ताधार्‍यांनी जे प्रयत्न केले ते यशस्वी ठरतात की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होईलच, परंतु अवघ्या काही क्षेत्रांची गुंतवणूक असणार्‍या आणि देशात १६व्या क्रमांकावर असणारी बँक बंद पडल्यामुळे अमेरिकेसारख्या महासत्ता असणार्‍या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येईल, हा निष्कर्ष मात्र न पटण्यासारखा आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही काही एका बँकेवर अवलंबून नाही, अमेरिका हा आज जागतिक सुपर पॉवर आहे, तो एक शक्तीशाली देश आहे. त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था ही बहुआयामी आहे. ती सावरण्यासाठी त्यांंच्याकडे अन्य पर्याय उपलब्ध असतात. त्याचा अशा वेळी वापर करून त्या धक्क्यातून सावरले जाते, पण एखादी गोष्ट अमेरिकेत झाली की आपल्याकडेही काहीतरी अप्रिय होणार हा आता एक ट्रेंड बनला आहे.

सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडणे आणि जागतिक मंदीची चर्चा ही सध्याच्या घडीला निरर्थक वाटत असली तरी गुंतवणूकदारांना जागतिक मंदीचे संकेत नेमके आत्ताच मिळणे, ही नाण्याची दुसरी बाजू जाणून घेणेदेखील महत्वाचे आहे. अनेक गुंतवणूकदारांना सिलिकॉन व्हॅली बँक बंद झाल्यानंतर २००८च्या जागतिक मंदीची आठवण का येऊ लागली आहे, याचे कारण जाणून घेणे महत्वाचे आहे. लेहमन ब्रदर्स या बँकिंग फर्ममुळे २००८ साली अमेरिकेला सर्वात मोठ्या बँकिंग संकटातून जावे लागले. केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगच मंदीच्या गर्तेत सापडले होते. खरेतर लेहमन ब्रदर्ससह अमेरिकेतील सर्व बँकांनी त्या काळात भरपूर कर्जे वाटली होती. २००१ ते २००६ या काळात अमेरिकेतील रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांना मोठी कर्जे देण्यात आली.

रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध बँकांकडून कर्जे वाटप करण्यात आली, परंतु लेहमन ब्रदर्स बँक फर्मकडून ती कर्जे परत कशी येतील याचा कोणताही सारासार विचार करण्यात आला नव्हता. यामुळे अमेरिकेतील रिअल इस्टेट क्षेत्र मात्र नव्या शिखरावर जाऊन पोहोचले. बँकांनीही यामाध्यमातून नफा कमावण्यात यश मिळविले, परंतु कंपन्यांना त्यांच्या मालमत्तेपेक्षा जास्त कर्ज दिल्याने कालांतराने या क्षेत्रात मंदी असताना बँकांच्या अडचणी वाढल्या. कंपन्या डबघाईला येऊ लागल्या आणि बँकांची कर्जे बुडू लागली. २००८ मध्ये लेहमन ब्रदर्सने स्वतःला दिवाळखोर घोषित केले. त्यानंतर रिअल इस्टेट आणि बँकिंग या दोन महत्वाच्या क्षेत्रांमध्ये उलाढाल कमी होऊन अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत होऊ लागली. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असणार्‍या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होताच त्याचे पडसाद जगभरातही उमटले आणि काही काळासाठी मंदी आली.

लेहमन ब्रदर्स ही बँकिंग फर्म दिवाळखोरीत जाणे, हेच मंदीचे प्रमुख कारण ठरले होते. एका बँकेच्या बंद पडण्यानेच संपूर्ण जगभरात मंदी सुरू झाली होती, असे बोलले जाते. या घटनेला आता जवळपास १५ वर्षे उलटली असून आताही पुन्हा एकदा तशीच अवस्था येईल, असे काही गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडल्याने जागतिक मंदीच्या वावड्या सर्वत्र उठत आहेत, परंतु येथे काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्या कदापि दुर्लक्षित करून चालणार नाहीत. लेहमन ब्रदर्स बँकिंग फर्म ही २००८ साली अमेरिकेतील चौथी सर्वात मोठी बँक होती.

या बँकेच्या बंद पडण्याने अमेरिकेत एका नव्या शिखरावर जाऊन पोहोचलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रासह अन्य महत्वाच्या क्षेत्रांवर याचा विपरित परिणाम जाणवला होता, त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला होता, परंतु आताची परिस्थिती ही फार वेगळी आहे. अमेरिकेतील १६वी मोठी बँक असणारी सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडण्याने अमेरिकेतील कोणत्याही महत्वाच्या क्षेत्रांवर सध्यातरी फारसा परिणाम जाणवलेला नाही. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुरळीत असून जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा प्रभाव सध्यातरी दिसण्याची शक्यता नाही. म्हणूनच २००८ सारख्या जागतिक मंदीच्या विषयावर बोलणे, सध्यातरी टाळले पाहिजे.

सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बंद पडण्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम जाणवेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे, परंतु या बँकेच्या बंद पडण्याने भारतीय बँकिंग अर्थव्यवस्थेवर सध्यातरी प्रभाव जाणवण्याची शक्यता नाही. सिलिकॉन व्हॅली बँकेमध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील काही भारतीय स्टार्टअप कंपन्यांचीही गुंतवणूक असल्याने या बँकेच्या बंद पडण्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम जाणवण्याचा संबंध जोडण्यात येतो, परंतु सध्यातरी असे समजणे चुकीचे ठरेल. कारण ज्या स्टार्टअप कंपन्यांची गुंतवणूक या बँकेच्या दिवाळखोरीत जाण्याने अडकली आहे, ती मिळवून देण्यासाठी भारताच्या केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या अर्थ खात्यासोबत भारताचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी चर्चा करून भारतीय स्टार्टअप कंपन्यांची गुंतवणूक कशाप्रकारे परत मिळविता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

या बँकेतील भारतीय स्टार्टअप कंपन्यांची गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणावर नसल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता फार कमी आहे. याचा आपल्या देशातील बँकिंग उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही. अमेरिकेमध्ये फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एफडीआयसी) सिलिकॉन व्हॅली बँकेच्या मालमत्ताही जप्त केल्या आहेत. त्यामुळे यातून लवकरच गुंतवणूकदारांची नुकसानभरपाई होईल. एकदा का गुंतवणूकदारांना आपले पैसे मिळण्यास सुरुवात झाली की, पुन्हा सर्व काही सुरळीत सुरू होईल. सध्याच्या घडीला स्टार्टअप कंपन्यांसमोर कर्मचार्‍यांचा पगार आणि इतर खर्च या सर्वांचा प्रश्न असेल, परंतु अल्पावधीतच बँकेवरील निर्बंध शिथिल होतील आणि गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळण्यास सुरुवात होईल.

म्हणूनच सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बंद पडण्याने फारसा प्रभाव जाणवेल, अशी कोणतीही शक्यता नाही. तसेच भारतीय बँकिंग क्षेत्रावर याचे पडसाद उमटतील, असाही अंदाज नाही. कारण आपली बँकिंग प्रणाली खूप मोठी आहे आणि त्यात अशा प्रकारची असुरक्षितता नाही. सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडताना समस्या ही होती की ठेवी स्टार्टअप्सकडून आल्या आणि कमी झाल्यामुळे बँकेला आपले रोखे विकावे लागले, ज्यामुळे तिचे मूल्य कमी झाले. आपल्याकडे अशी काही परिस्थिती उद्भवलेली नाही. भारतीय बँकिंग क्षेत्रावर सिलिकॉन व्हॅली बँक बुडण्याचा काही परिणाम होणार नाही. कारण भारत ही एक मोठी अर्थव्यवस्था असून भारतीय बँका सुस्थितीत आहेत. भांडवली बाजाराबद्दल सांगायचे झाले, तर याचा किरकोळ परिणाम दिसून येऊ शकतो. जगात काही मोठी घटना घडली तर त्याचा परिणाम सर्व बाजारांवर होतो. त्यामुळे सध्याच्या घडीला काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत असले तरी यातून पुन्हा उभारी घेता येणे शक्य आहे.

First Published on: March 15, 2023 10:00 AM
Exit mobile version