द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊन शिवसेना वाचणार?

द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊन शिवसेना वाचणार?

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भूमिपुत्रांसाठी स्थापन केलेल्या आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांसाठी वाहून घेतलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच राज्यातील आणि केंद्रातील राजकीय घडामोडींमुळे धोक्यात आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पारडे जड होऊ नये याकरताच भाजप मधल्या दिल्लीतील चाणक्यांनी शिवसेनेबरोबर खेळी करून महाराष्ट्रातील पवारांच्या संस्थानाला अडीच वर्षाच्या सत्तेनंतर पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि दिल्लीतील चाणक्य अमित शहांविरुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या या टकमक टोकाच्या राजकीय वर्चस्वच्या लढाईत शिवसेना मात्र खोल दरीत लोटली गेली आहे. शिवसेना वाचवायची की शरद पवार यांना दिलेला शब्द वाचवायचा अशा कोंडीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुरते अडकले आहेत. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 ते 14 खासदार तसेच शिवसेनेला समर्थन करणारे 10 अपक्ष आमदार अशी भली मोठी रसद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि तत्कालीन सरकारमधील राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे देशातील महाशक्तीच्या अर्थात मोदी आणि शहा यांच्या भाजपच्या गोटात संरक्षणासाठी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच शरद पवार यांनादेखील नामोहरम करण्याची आयती संधी मोदी आणि शहा यांनी साधली असून थेट उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणार्‍या एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या या एकाच दगडात एक नव्हे, दोन नव्हे , तीन नव्हे तर अनेक पक्षी गारद झाले आहेत. मात्र यामध्ये उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागत आहे. निवडून आलेले शिवसेनेचे बहुसंख्य आमदार आणि खासदार देखील शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरचे संबंध तोडून पुन्हा भाजपकडे जावे या विचारांचे आहेत तर स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांपूर्वीच मुख्यमंत्री पदावरून भाजपशी असलेली युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर नव्याने घरोबा केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जर शिवसेना वाचवायचे असेल अथवा शिवसेनेचे अधिक नुकसान होऊ नये अशी जर त्यांची इच्छा असेल तर येत्या 18 जुलै रोजी होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे हे शिवसेना वाचवण्याचा अंतिम पर्याय चाचपडू शकतात.

मात्र त्यामुळे शिवसेनेचे नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राजकीय हाडवैर पत्करावे लागणार आहे. इकडे पवार तिकडे मोदी आणि शहा यांच्या कात्रीत उद्धव ठाकरे फसले आहेत. महाभारतामध्ये देखील अर्जुन पुत्र अभिमन्यू हा चक्रव्यूहमध्ये फसला होता. अशाच राजकीय चक्रव्यूहामध्ये उद्धव ठाकरे हे अडकले आहेत यातून जर ते सही सलामत चक्रव्यूह भेदून सुरक्षितपणे बाहेर पडू शकले तरच शिवसेना टिकू शकेल आणि अधिक बळकट होऊ शकेल.

नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी निवडणुकीत युती केलेल्या भाजपशी पंगा घेत काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपचे दिल्लीपासून ते मुंबईपर्यंतचे सर्व नेते शिवसेनेने सत्तेसाठी केलेल्या या अनैसर्गिक आघाडीबाबत सातत्याने तावातवाने बोलत होते. तसं बघायचं गेल्यास भाजपच्या या आरोपांमध्ये एक सत्य हे होते की शिवसेनेच्या उमेदवारांना जी मते मिळाली त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा तसेच भाजप या पक्षाचा शिवसेनेला नक्कीच राजकीय लाभ झाला होता. त्याचबरोबर भाजपलादेखील शिवसेनेची असलेल्या युतीमुळे राजकीय लाभ झाला हे देखील नाकारून चालणार नाही. भाजप आणि शिवसेना हे जरी दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आणि संघटना असले तरी देखील हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी विचार प्रणालीशी एकनिष्ठ असलेले पक्ष आहेत.

शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेच्या पक्षप्रमुखांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना पक्ष संघटनेकडे ही पुरेसे लक्ष देणे आवश्यक होते. मात्र एकीकडे सत्ता आल्यानंतर अवघ्या चार महिन्यानंतर राज्यात आलेली कोरोनाची लाट, भीषण टाळेबंदी, राज्याचे कोलमडून पडलेले आर्थिक गणित आणि त्यात तीन पक्षांचे सरकार चालवण्याची मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना करावी लागणारी कसरत त्याचबरोबर स्वतःची प्रकृती सांभाळणे, दोन शस्त्रक्रिया या काळात होणे या एवढ्या भल्यामोठ्या संकटात पुढे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना शिवसेनेला आणि शिवसैनिकांना मुख्यमंत्री म्हणून न्याय देता आला नाही हे देखील एक कटू सत्य त्यांनी स्वीकारण्याची गरज आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे केवळ कोणत्याही आमिषा पोटी स्वतःच्याच पक्ष संघटनेचे चाळीस आमदार स्वतःचाच पक्षप्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्या विरोधात उठाव अथवा बंड करणे हे जेवढे दिसते आणि भासते तितके सहज सोपे नक्कीच नाही.

अगदी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जर शिवसेनेतील वावर आणि मुक्त संचार जरी लक्षात घेतला तरी देखील शिवसेनेचे तब्बल 40 आमदार 12 ते 14 खासदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहकार्य करणारे 10 अपक्ष आमदार एवढा मोठा फौज फाटा उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर नेणे हे देखील दिसते तितके सोपे नक्कीच नाही. एकनाथ शिंदे यांची राज्यातील आणि आता देशातील जी ओळख आहे ती आजही ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मातब्बर नेते अशीच आहे. वास्तविक 2014 मध्ये राज्यात भाजपच्या सरकारमध्ये प्रारंभी एकनाथ शिंदे यांना अल्पकाळासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते करण्यात आले. 18 दिवस विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेल्या एकनाथ शिंदे यांना मग शिवसेना राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सत्तेत सहभागी झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळाले. त्यामुळे वास्तविक एकनाथ शिंदे यांचा राज्यभरातील शिवसेना आमदार खासदार आणि पदाधिकार्‍यांशी जो प्रत्यक्षात संबंध येण्यास सुरुवात झाली तीच मुळात 2014 नंतर आहे.

मात्र असे असले तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा आणि जनसंपर्क हा प्रचंड आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे जवळपास सर्वच मंत्री आणि नेते हे सातत्याने भाजप नेतृत्वावर तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोज तोंडसुख घेत असताना एकनाथ शिंदे यांनी मात्र एखाद दुसरा अपवाद वगळता देवेंद्र फडणवीस यांच्यावर कधीही थेट अथवा अप्रत्यक्ष देखील टीका केली नाही.

हे येथे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तेव्हापासून चांगले संबंध होते. वरिष्ठ नेतृत्वाकडून काम कसे सकारात्मक आणि जलद गतीने करून घ्यावे यामध्ये एकनाथ शिंदे यांचा खरोखरच हातखंडा आहे. त्यामुळेच ते एकाच वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील त्या काळात अत्यंत निष्ठावंत राहिले तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील त्यांचे संबंध त्यांनी कधीही या राजकारणात कटू होऊ दिले नाहीत. एकनाथ शिंदे हे राज्य सरकारमधील क्रमांक दोनच्या अर्थात नगर विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर देखील त्यांचे भाजप नेत्यांशी तसेच संघ परिवाराशी असलेले नातेसंबंध त्यांनी दुरावू दिले नाहीत. त्यामुळेच जेव्हा राज्यात एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधातच दंड थोपटले तेव्हा शिंदे यांच्या मदतीसाठी भाजपमधील त्यांचा हा मित्रपरिवारच धावून आला. स्वतःला मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे तसेच एकेकाळी आपल्या सरकारमध्येच आपल्या हाताखाली असलेल्या शिवसेनेच्या एका मंत्राच्याच हाताखाली आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे लागत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मनातून कितीही नाराज असले तरी देखील, एक वेळ फडणवीस यांना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून परवडले मात्र अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या जागी फडणवीस यांना कदापिही परवडू शकणार नाहीत याची पूर्ण कल्पना स्वतः देवेंद्र फडणवीस यांना आहे.

तथापि या सर्व शह काटशह आणि राजकीय डावपेचांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अपरिमित व कधीही भरून न येणारी हानी झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 2019 मध्ये जेव्हा राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार हे निश्चित झाले होते. तेव्हाच जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांनी केलेल्या आग्रहाला विनम्र नकार दिला असता आणि जर एकनाथ शिंदे हे त्यावेळीच मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित एकनाथ शिंदे यांना बंड करून मध्यरात्री सुरत गाठण्याची वेळ आली नसती.

यातूनच शिवसेनेत बंडाळी म्हणा अथवा उठाव म्हणा तो झाला. शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी तब्बल 39 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. 18 खासदारांपैकी १२ खासदार हे शिंदे यांच्या जवळचे आहेत. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे असून ते तळागाळात काम करणारे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सहाजिकच निवडून येण्यासाठी ज्याप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवारांना शिवसेना या पक्षाची उमेदवारी आवश्यक असते त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मदतीला कधीही धावून जाणार्‍या नेत्याची देखील शिवसैनिकांना नितांत गरज असते हे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी देखील ज्या एकनाथ शिंदेंमुळे आपल्याला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले, शिवसेनेच्या अस्तित्वावरच ज्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि एवढी बंडाळी माजवून जे एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने राज्यात मुख्यमंत्री झाले त्या एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात अद्यापही उद्धव ठाकरे यांना दुसरा ठाणे जिल्हा प्रमुख नेमता आलेला नाही यातच सर्व काही आले. त्यामुळे बहुसंख्य शिवसेना आमदार आणि खासदारांच्या आग्रही मागणीनुसार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मु यांना पाठिंबा द्यावा आणि सर्वप्रथम शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न करावा एवढेच यानिमित्ताने सांगता येऊ शकते.

First Published on: July 12, 2022 4:00 AM
Exit mobile version