“आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करू…”, पंतप्रधान मोदींनी मानले आभार

“आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करू…”, पंतप्रधान मोदींनी मानले आभार

नवी दिल्ली : मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणापैकी मिझोराम वगळता चार राज्यांची मतमोजणी आज (ता. 03 डिसेंबर) करण्यात आली आहे. सध्या ते चार राज्यांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी तेलंगणा राज्यात काँग्रेसला जवळपास बहुमत मिळाल्याचे निश्चित झाले आहे. तर अन्य तीन राज्यांत भाजपाची सत्ता स्थापन होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पाचपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता येणार होती. परंतु, आता पाचपैकी केवळ एका राज्यात काँग्रेसला सत्ता स्थापन करता येणार आहे. या निकालानंतर आता देशभरात भाजपाचा जल्लोष सुरू झाला आहे. तीन राज्यातील जनतेने मोदींनाच आपले मत दिल्याचे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहेच. याबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – MP Election Analysis : मोदींकडून झंझावती प्रचार, चौहानांची ‘लाडली’; हाच ठरला BJP विजयाचा फॅक्टर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या सोशल मीडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून एक पोस्ट करत जनतेचे आभार मानले आहे. जनतेला माझा प्रणाम! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे, हे सिद्ध होते. भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल, मी या सर्व राज्यातील मतदारांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू, अशी पोस्ट मोदी यांनी शेअर केली आहे.

तेलंगणात भाजपाचा दारुण पराभव झालेला असला तरी पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणाच्या जनतेचेही आभार मानले आहेत. याबाबत X या सोशल मीडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून एक पोस्ट करत लिहिले आहे की, तेलंगणातील माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी खूप आभार. गेल्या काही वर्षांमध्ये तुमचा आम्हाला मोठा पाठिंबा मिळालेला आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही मी कौतुक करतो.

First Published on: December 3, 2023 6:09 PM
Exit mobile version