इरफान खानच्या हॉलिवूडमधल्या गाजलेल्या व्यक्तीरेखा आणि सिनेमे!

आपल्या सर्वांगीण आणि अष्टपैलू अभिनयाने स्वत:ची अशी वेगळी छाप फक्त आपले चाहतेच नाहीत, फक्त बॉलिवूडच नाही तर पार साता समुद्रापारच्या सिनेसृष्टींमध्ये देखील उमटवणारे अभिनेते इरफान खान यांचं वयाच्या ५४व्या वर्षी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात कर्करोगाने निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी सिनेसृष्टीत निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यांचे बॉलिवूडमधले हिंदी भाषिक सिनेमे आणि त्यातल्या त्यांच्या व्यक्तिरेखा तर विशेष गाजल्याच, पण त्यासोबतच त्यांनी काही इंग्रजी भाषिक सिनेमांमध्ये देखील केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. २००७ पासून त्यांचा अभारतीय भाषांमधल्या अभिनयाचा प्रवासा सुरु झाला. द दार्जिलिंग लिमिटेड या सिनेमामध्ये इरफान खान यांनी एक छोटीशी व्यक्तीरेखा साकारली होती.

स्लमडॉग मिलेनियर…

२००८मध्ये आलेल्या स्लमडॉग मिलेनियरमधली त्यांची व्यक्तिरेखा विशेष गाजली. या चित्रपटाला त्या वर्षातला ऑस्कर पुरस्कार देखील मिळाल्यामुळे त्यांच्या यशाला चार चाँदच लागले. स्लमडॉग मिलेनियरमध्ये इरफान खान यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

लाईफ ऑफ पाय…

२०१२मध्ये आलेल्या लाईफ ऑफ पाय या सिनेमामुळे इरफान खान यांच्यामधल्या एका वेगळ्या अभिनेत्याची ओळख भारतासोबतच जगाला झाली. खरंतर याच सिनेमापासून त्यांच्यातल्या वास्तवदर्शी आणि साचेबद्ध नसलेल्या अभिनयाला सुरुवात झाली. या सिनेमामध्ये पाय पटेल या मुख्य व्यक्तिरेखेची मोठेपणीची भूमिका इरफान खान यांनी साकारली होती.

अमेझिंग स्पायडरमॅन…

२०१२मध्येच इरफान खान यांनी जगभरातल्या प्रेक्षकांना ज्या सिनेमांनी वेड लावलं, त्या स्पायडर मॅन सीरीजमधल्या अमेझिंग स्पायडरमॅनमध्ये देखील आपल्या अभिनयाची झलक आख्ख्या जगाला दाखवली. जगभरातल्या सिनेरसिकांनी त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. या सिनेमात इरफान खान यांनी डॉ. राठाची भूमिका साकारली होती.

ज्युरासिक वर्ल्ड…

२०१५मध्ये जगभर प्रदर्शित झालेल्या ज्युरासिक वर्लडमध्ये इरफान खान यांनी साकालेला सिमन मासरानी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील असाच होता.

पझल…

लाईफ ऑफ पायनंतर इरफान खान यांनी अभारतीय भाषेत साकालेली भूमिका होती पझल या २०१८मध्ये आलेल्या सिनेमातल्या एका पझलरची. पझलर अर्थात जी व्यक्ती कोडी टाकते अशा व्यक्तीची व्यक्तीरेखा. या भूमिकेला देखील इरफान खान यांच्या असंख्य चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं.

इन्फर्नो…

जगभरातल्या सिनेरसिकांच्या गळ्यातला ताईत असलेल्या टॉम हँकसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी इन्फर्नो या सिनेमात दिग्दर्शकांनी इरफान खान यांची निवड केली तीच त्यांच्यातल्या उत्कृष्ट अभिनेत्याची पोचपावती होती. या सिनेमात इरफान खान यांनी हॅरी द प्रूव्हेस्ट सीम ही व्यक्तीरेखा साकारली होती. या सिनेमातल्या इरफान खानच्या अभिनयाचं कौतुक टॉम हँकने देखील केलं होतं.


वाचा सविस्तर : अभिनेते इरफान खान यांचं मुंबईत निधन
First Published on: April 29, 2020 1:33 PM
Exit mobile version