दीपिका माझ्यासाठी लक्ष्मी

दीपिका माझ्यासाठी लक्ष्मी

Ranveer Singh & Deepika

अभिनेता रणवीर सिंग सध्या फार्मात आहे. दीपिकाबरोबर विवाहबद्ध होऊन अनेक दिवस उलटलेले आहेत, तरी त्याची चर्चा अद्याप काही थांबलेली नाही. ‘गल्लीबॉय’, ‘सिम्बा’ हे त्याचे चित्रपट यशस्वी ठरलेले आहेत. प्रेक्षकांतच या चित्रपटाविषयी कुतूहल नाही तर चक्क बीगबी अमिताभ बच्चन यांनी त्याच्या ‘गल्लीबॉय’ चित्रपटातील रॅपचे कौतुक केलेले आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे निराश, एकाकी राहणे त्याला स्वत:ला मान्य नाही. बिनधास्त, मोकळेपणाने संवाद साधणे, हजरजबाबीपणा आणि सतत मस्ती हा त्याच्या अंतरंगाचा एक भाग आहे. मित्राची मैफिल असो नाहीतर पत्रकार परिषद असो, मोजके बोलणे त्याला माहीत नाही. म्हणून त्याचे सुपरस्टारपद कोणाला नाकारता येत नाही. फिल्म फेअर गेली चौसष्ट वर्षे चित्रपट महोत्सवाचे आयोजन करते. त्याचे स्वरुप, रुपरेषा, पुरस्काराची घोषणा करण्यासाठी सेलिब्रिटी कलाकारांना निमंत्रित केले जाते. यंदा हा मान रणवीर सिंग याला प्राप्त झाला होता.

फिल्म फेअरच्यावतीने शॉर्टफिल्म पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. रणवीरने यावेळी त्याची घोषणा केली. दिपक लांबा, जितेश पिल्लई, अनिल वर्मा, नीना जयपूरीया आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यापूर्वी पुरस्कार सोहळ्यामध्ये एक कलाकार म्हणून प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभाग होता. आज घोषणा करण्यासाठी आपल्याला निमंत्रित केले गेले आहे याचा आनंद व्यक्त करताना रणवीरने फिल्म फेअरमधील काही आठवणी सांगितल्या. अमिताभ बच्चनसारखा कलाकार होणे नाही, असं सांगताना दीपिकाबरोबर विवाहबद्ध झाल्याने रोजच्या जीवनाला चांगले म्हणावे असे बंधन आलेले आहे. दीपिका ही माझ्यासाठी लक्ष्मी आहे. तिची स्वत:ची घराविषयी शिस्त आहे जी मी लग्न झाल्यानंतर पाळत आलेलो आहे. जाणे-येणे-खाणे-पिणे या सर्व गोष्टींवर नियंत्रण आल्याने माझे जगणे सुखद आणि आणखीन आनंददायी झालेले आहे असे रणवीर सांगतो.

First Published on: March 13, 2019 4:10 AM
Exit mobile version