‘ताठ कणा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, उमेश कामत दिसणार डॉक्टरांच्या भूमिकेत

‘ताठ कणा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, उमेश कामत दिसणार डॉक्टरांच्या भूमिकेत

‘ताठ कणा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, उमेश कामत दिसणार डॉक्टरांच्या भूमिकेत

प्लीफ सर्जरीमुळे जगविख्यात झालेल्या डॉ. पी. एस. रामाणी यांचे नाव, त्यांच्या संशोधनामुळे पाठीच्या कण्याशी कायमचे जोडले गेले आहे. पाठीच्या कण्यामधील एका दोषावर त्यांनी शोधून काढलेल्या उपायाने हजारो रुग्णांना आजवर वेदनामुक्त केले आहे. १६ ऑक्टोबर या ‘वर्ल्ड स्पाइन डे’चा मुहूर्त साधून डॉ. रामाणी यांच्या या संघर्ष व संशोधनावर आधारित ‘ताठ कणा’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. स्वतः डॉ.प्रेमानंद रामाणी, चित्रपटाचे निर्माते विजय मुडशिंगीकर, करण रावत, चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते, लेखक श्रीकांत बोजेवार तसेच डॉ. रामाणी यांची भूमिका साकारणारा अभिनेता उमेश कामत यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी समारंभ झाला.

डॉ. रामाणी यांनी लहानपणापासूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत विलक्षण कौशल्याने आणि बुद्धीने आपली वाटचाल केली. हे करीत असताना आपल्या सामाजिक दृष्टीचे भान जपत हजारो रुग्णांच्या वेदना कमी केल्या, अनेकांना जीवनदान दिले. त्यांचा हाच दृष्टीकोन आपल्याला ‘ताठ कणा’ या त्यांच्या १७ आवृत्त्या प्रकशित झालेल्या वाचकप्रिय आत्मचरित्रात्मक पुस्तकातूनही अनुभवायला मिळतो. काही प्रमाणात या पुस्तकावर तसेच अन्य महत्त्वाच्या घटनांवर आधारलेला ‘ताठ कणा’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे. चित्रपटात डॉ. रामाणी यांची भूमिका अभिनेता उमेश कामत यांनी साकारली आहे.

‘डॉ.रामाणी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे’, उमेशने यावेळी सांगितले. ‘ताठ कणा’ हा एक वेगळा चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी ही आपल्यासाठी एका अजोड व्यक्तिमत्वाला जाणून घ्यायचा प्रवास असल्याचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितले. तर, ‘चित्रपटरूपाने दाखविण्यात येणारा प्रवास माझ्यासाठी निश्चितच आनंददायी आहे‘ असे डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी यावेळी सांगितले.

‘ताठ कणा’ या चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. छायांकन कृष्णकुमार सोरेन व संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत. ‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर, व ‘स्प्रिंग समर फिल्म’चे करण रावत यांनी ‘ताठ कणा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


हेही वाचा – ‘या’ मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी


 

First Published on: October 21, 2020 4:04 PM
Exit mobile version