Shubha Khote : अलविदा, सोबती…60 वर्षांचा सहवास संपला, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन

Shubha Khote : अलविदा, सोबती…60 वर्षांचा सहवास संपला, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन

मुंबई : मराठी सोबतच हिंदी अभिनय सृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवून मोठा तसेच छोटा पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांचे गुरुवारी (28 मार्च) रात्री निधन झाले.

अभिनेत्री शुभा खोटे यांनीच दिनेश बलसावर यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. शुभा खोटे यांनी पती दिनेश बलसावर यांच्यासोबतच्या काही फोटोंचा कोलाज शेअर करत भावूक संदेश लिहिला आहे. हा कोलाज शेअर करत शुभा खोटे म्हणतात, 60 वर्षे आम्ही एकमेकांना म्हणत आलो की, सोबत म्हातारे होऊयात, अजून आपल्या आयुष्यात सर्वोत्तम गोष्ट यायची आहे. मात्र, तू पुढे निघून गेला आहेस…अलविदा जीवनसाथी…

शुभा खोटे यांचे पती हे सुद्धा फिल्म इंडस्ट्रीशी निगडित होते. निर्माता म्हणून त्यांचा बराच दबदबा होता. हिंदी सोबतच मराठी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. 1967 मध्ये रिलीज झालेला चिमुकला पाहुणा हा त्यांनी निर्मित  केलेला चित्रपट होता. या सिनेमात शुभा खोटे आणि त्यांचे भाऊ विजू खोटे या भावंडांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती शुभा खोटे यांचे होते. 1964 मध्ये शुभा यांचे दिनेश यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना भावना बलसावर आणि अश्विन बलसावर ही दोन मुलं आहेत.

हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांमुळे ‘ठाकरे’ झाले बरे; वाचा काय आहे प्रसंग

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत दुर्गा आत्याच्या भूमिकेत नुकत्याच शुभा खोटे दिसल्या होत्या. या भूमिकेसाठी तसेच या वयातही कामाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणासाठी त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांनी ससुराल, देख कबीरा रोया, संजोग, बरखा, ग्रहस्ती, छोटी बहन यांसारख्या सुपरहिट सिनेमात काम करून आपली ओळख निर्माण केली.

मुलगी भावना बलसावरची भावूक पोस्ट

‘देख भाई देख’ फेम अभिनेत्री भावना बलसावर ही शुभा खोटे आणि दिनेश बलसावर यांची कन्या आहे. भावना बलसावरनेही सोशल मीडियावर वडिलांच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अतिशय साहसी आणि धाडसी असलेले दिनेश बलसावर हे या जगाला मागे टाकून पुढच्या प्रवासाला निघाले आहेत, मात्र, त्यांच्या या प्रवासातील किस्से ते आम्हाला सांगू शकत नाही, अशी भावूक पोस्ट भावनाने लिहिली.

हेही वाचा – Stone Pelting At Shirsoli: जळगावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक; अनेक जखमी

First Published on: March 29, 2024 12:54 PM
Exit mobile version