अभिनेत्री स्मिता तांबेचा ‘गढूळ’ इफ्फीमध्ये झळकणार

अभिनेत्री स्मिता तांबेचा ‘गढूळ’ इफ्फीमध्ये झळकणार

यंदा ‘इफ्फी’ महोत्सव ५०वं वर्षं साजरं करत आहे. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान पणजी, गोवा येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १५ नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये मराठी अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या ‘गढूळ’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ‘गढूळ’ची निवड होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री स्मिता तांबे हिने दिली.

‘गढूळ’ सोबत ‘हे’ पाच चित्रपटही झळकणार

यंदा ‘इफ्फी’ महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी लोटन-पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला’, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’, अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राइम नंबर १०३|२००’, आदित्य राही आणि गायत्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो प्रेम’ हे पाच मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

यापूर्वीसुद्धा स्मिताचे हे चित्रपट झळकले होते

यावेळी महोत्सवात हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांसोबत प्रादेशिक भाषेतील २६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यावेळी १५ नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. याच नॉन फिचर विभागात स्मिता तांबेच्या ‘गढूळ’ चित्रपटाची निवड झाली आहे. स्मिताचा हा पहिलाच सिनेमा नाही जो इफ्फीमध्ये सादर होत आहे. यापूर्वीसुद्धा स्मिता तांबेच्या चार चित्रपटांची इफ्फीमध्ये वर्णी लागली होती. धुसर, रुख, पांगिरा हे ते चित्रपट होत.

ज्यावेळी पहिल्यांदाच मी इफ्फीमध्ये सहभागी झाले. तेव्हा मला या चित्रपट महोत्सवाच्या भव्यतेबद्दल मला कल्पना नव्हती. पण त्यानंतर हा महोत्सव म्हणजे सिनेरसिकांची पंढरी असल्याचे लक्षात आले. जगभरातील फिल्ममेकर्स आणि कलावंताना भेटण्याची संधी ह्या चित्रपट महोत्सवातून मिळते. त्यामुळे भारतातील सिनेमहोत्सवांमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या इफ्फीमध्ये आपल्या सिनेमाची निवड होणे, ही एक कौतुकाची थाप आहे. यंदा इफ्फीमध्ये ‘गढूळ’ची निवड होणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
स्मिता तांबे, अभिनेत्री

First Published on: November 11, 2019 6:35 AM
Exit mobile version