आदिनाथ म्हणतो एम फॉर महेश

आदिनाथ म्हणतो एम फॉर महेश

Adinath Kothare

चित्रपटसृष्टी नावाच्या बाबतीत भरपूरच जागृत दिसते. कितीतरी अभिनेते, अभिनेत्रींनी आपले मूळ नाव बाजूला सारुन केवळ ज्योतिषाच्या सांगण्यावरून नवीन नाव धारण केलेले आहे. नावात ठरावीक अक्षर आले की भाग्य उजळते असाही मानणारा गट चित्रपटसृष्टीमध्ये आहे. महेश मांजरेकर, संजय जाधव यासारखे कितीतरी दिग्दर्शक आहेत ज्यांनी आपल्या नावाबरोबर आपल्या वडिलांचेही नाव येईल असे पाहिले आहे. एखाद्या कलाकाराचे नाटक, चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:च्या नावाचे वलय निर्माण झाल्यानंतर सहसा त्यामध्ये वडिलांच्याही नावाचे अक्षर यावे असा आग्रह धरत नाहीत. आदिनाथ म्हणजे महेश कोठारेंचा चिरंजीव हे आता कोणा प्रेक्षकाला सांगायला नको.

लहानपणापासून ते अगदी युवावस्थेपर्यंत आदिनाथ कोठारे या नावाने हिंदी, मराठी चित्रपटामध्ये त्याने काम केलेले आहे. अभिनेता याचबरोबर निर्मिती, दिग्दर्शनातही तो उतरलेला आहे. त्याच्या पाणी या दिग्दर्शित चित्रपटाचे बर्‍यापैकी कौतुक होत आहे. अशा पार्श्वभूमीवर कबीर खान दिग्दर्शित एटी थ्री हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. क्रिकेटचा विश्वकप जिंकला त्यावर हा चित्रपट आधारलेला आहे. आदिनाथ या हिंदी चित्रपटामध्ये दिलीप वेंगसरकरच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी आदिनाथने स्टॅण्ड बाय या हिंदी चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटामध्ये मात्र दिग्दर्शकापासून अन्य क्रिएटीव्ह टीमने आदिनाथच्या नावात महेशमधला एम हे अक्षर टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्क्रिनवर जी नामावली दाखवली जाणार आहे त्यात हा बदल झालेला दिसेल. त्यामुळे सिनेमा पहाणार्‍यांसाठी आदिनाथ म्हणतो एम फॉर महेश असे आपल्याला वाटेल; पण हे दिग्दर्शकाचे सांगणे आहे. ते आदिनाथला कितपत लकी ठरते ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लक्षात येईल.

First Published on: April 2, 2019 4:37 AM
Exit mobile version