पट्या मी तुला… प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर प्रशांत दामले यांची भावनिक पोस्ट चर्चेत

पट्या मी तुला… प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर प्रशांत दामले यांची भावनिक पोस्ट चर्चेत

मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते. गिरगाव येथील राहत्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. यात मराठी नाट्यक्षेत्रात त्यांनी आपला वेगळाच दबदबा निर्माण केला. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. मात्र प्रदीप पटवर्धन यांच्या अकाली निधनामुळे सिनेसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान प्रदीप पटवर्धनांच्या निधनावर अभिनेते प्रशांत दामले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली देत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. “पट्या… प्रदीप पटवर्धन…

मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या…सिद्धार्थ कॉलेज ची 5 वर्ष (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती. ही घानिष्ठ मैत्री आता एक तर्फीच चालु राहणार. मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे. पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार…” असं प्रशांत दामले यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

मोरूची मावशी नाटकामुळे मिळाली प्रसिद्धी
मोरूची मावशी हे त्यांचे प्रचंड गाजलेले नाटक. या नाटकामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. एक विनोदी अभिनेते म्हणून प्रदीप पटवर्धन यांना ओळखले जायचे. विनोदाचे टायमिंग व हजरजबाबीपणा यामुळे त्यांनी रसिकांवर आपली वेगळी छाप निर्माण केली होती. मराठीतील मालिका आणि चित्रपटातही वेगवेगळ्या धाटणीच्या उत्तम भूमिका साकारल्या. त्यासोबतच अनेक दर्जेदार नाटकातही त्यांनी अभिनय केला.


हेही वाचा :रंगभूमीवरचा आनंदी चेहरा हरपला; प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

First Published on: August 10, 2022 11:09 AM
Exit mobile version