Amitabh Bachchan बिग बींनी आई ‘तेजी बच्चन’ यांच्याबरोबर केला होता नाटकात अभिनय

अष्टपैलू अभिनयातून अभिनयाची उंची गाठणारे , अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, लोकप्रियतेचे उत्तुंग शिखर गाठणारे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज (११ ऑक्टोबर) ७९ वाढदिवस आहे. भारतातच नाही तर परदेशातही बिग बींचे लाखो चाहते आहेत. यामुळे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. पण बिग बींनी कधीकाळी आई तेजी बच्चन यांच्याबरोबर अभिनय केला होता याबद्दल फारसे कोणाला माहित नाही.

बिग बींना त्यांच्या आई वडिलांबद्दल नितांत आदर व प्रेम असल्याचे आपण त्यांच्या मुलाखतीतून अनेकदा ऐकतो. त्यांच्या जडण घडणीत आई तेजी बच्चन व वडील हरिवंशराय बच्चन यांचा किती मोलाचा वाटा होता याबद्दल अनेकवेळा बिग बी सांगतात. तर कधी वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांमधून ते व्यक्तही होतात.

मोठ्या पडद्यावर येण्याआधी अमिताभ बच्चन नाटकात छोटं मोठ काम करायचे. १९६७ साली अमिताभ यांनी विलियम शेक्सपियरच्या ‘ऑथॅलो’ या मूळ इंग्रजी नाटकाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनय केला होता. आश्चर्य म्हणजे या नाटकात अमिताभ यांच्याबरोबर त्यांची आई तेजी बच्चन यांनीही अभिनय केला होता. तर या मूळ इंग्रजी नाटकाचे हिंदी अनुवादन त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी केले होते.

दरम्यान, बिग बींच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे बिग बींनी ८० व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे त्यांच्या खास स्टाईलने टि्वट केले आहे. त्यात त्यांनी एका हिंदी म्हणीचा हवाला दिला आहे.
जब साठा (60 ) तब पाठा
जब अस्सी (80) तब लस्सी !!! 🤣🤣🤣

मुहावरे को समझना भी एक समझ है

असे मजेशीर टि्वट करत वाढत्या वयातला आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

First Published on: October 11, 2021 1:33 PM
Exit mobile version