अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती; म्हणाले, हृदयविकाराचा झटका…

अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती; म्हणाले, हृदयविकाराचा झटका…

Annu Kapoor Health Update | मुंबई – छातीत दुखू लागल्याने प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर यांना काल दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर म्हणाले की, अन्नू कपूर यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही. कंजेशन होतं. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे.

प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर यांना २६ जानेवारी रोजी छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचवर डॉ. अजय उपचार करत आहेत.

अभिनेते, गायक, दिग्दर्शक, रेडिओ जॉकी, टीव्ही होस्ट अशा विविध भूमिकांतून अन्नू कपूर यांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व सिद्ध केलं आहे. त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक चित्रपट केले असून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि टीव्ही अकदामी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अन्नू कपूर हे एका गरीब पंजाबी कुटुंबातून होते. २० फेब्रुवारी १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मदनलाल कपूर हे एक पारशी थिएटर चालवत असत. शहरा शहरात गोल्लीबोळांत जाऊन ते नाटकं सादर करत असत. त्यांचे वडील पंजाबी असले तरीही आई बंगाली होत्या. त्या उत्तम कवयित्री होत्या. अन्नू कपूर लहानपणीच त्यांच्या वडिलांच्या थिएटर कंपनीत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतलं. गायक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये मुसाफिरी केली आहे.

First Published on: January 27, 2023 7:44 AM
Exit mobile version