Cruise Drug Case: आर्यन खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा; ‘ही’ अट केली शिथिल

Cruise Drug Case: आर्यन खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा; ‘ही’ अट केली शिथिल

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जामीन मिळाल्यापासून दर आठवड्याला शुक्रवारी आर्यन खान मुंबईच्या एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल होत होता. मात्र आता ही अट उच्च न्यायालयाने शिथिल करून आर्यनला दिलासा दिला आहे. आर्यनला चौकशीपूर्वी एनसीबीला ७२ तास आधी नोटीस देण्यास सांगितले आहे.

२८ ऑक्टोबरमध्ये आर्यन खानला याप्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. उच्च न्यायालयाने काही अटी-शर्थीवर आर्यनचा जामीन मंजूर केला होता. त्यामध्ये दर आठवड्याला शुक्रवारी आर्यनला एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची अट होती. त्याप्रमाणे जामीन मिळाल्यापासून आर्यन खान दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल होत होता.

परंतु दरम्यानच्या काळात हा तपास दिल्लीच्या एनसीबीच्या एसआयटीकडे गेल्याने आता मुंबईच्या एनसीबी कार्यालयात आर्यनच्या हजेरीची काही गरज नाही. आर्यन जी काही चौकशी व्हायची होती, ती झालेली आहे. त्याचा जबाब देखील नोंदवून झालेला आहे. जर तपास यंत्रणेला गरज भासली तर दिल्लीच्या एनसीबी कार्यालयात आर्यन हजर राहण्यास तयार आहे. त्यामुळे दर आठवड्याला शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची अट शिथिल करण्यात यावी, अशी विनंती आर्यनच्या अर्जात करण्यात आली. कारण आर्यनची हजेरी असताना नाहक पोलिसांना त्याठिकाणी बंदोबस्त ठेवावा लागतो आणि पोलीस यंत्रणेवर सुद्धा ताण पडतो. या बाबी लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने आर्यनला दर आठवड्याला एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची अट रद्द केली आहे. त्यामुळे आता दर शुक्रवारी मुंबईच्या एनसीबी कार्यालयात आर्यनला हजर राहण्याची गरज नाही. जर दिल्लीच्या एनसीबीच्या एसआयटीला आर्यनची चौकशी करण्याची गरज भासली तर ७२ तास आधी आर्यनला नोटीस दिली जाऊ शकते. दरम्यान मुंबईबाहेर जायचे असल्यास आर्यनला प्रवास आणि मुंबईबाहेरील निवासाचा संपूर्ण तपशील एनसीबी एसआयटीला द्यावा लागेल, असेही मुंबई उच्च न्यायलयाने सुधारित आदेशात स्पष्ट केले.


हेही वाचा – OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, राज्य सरकारला मोठा दणका


 

First Published on: December 15, 2021 1:32 PM
Exit mobile version