फसवणुकीच्या गुन्ह्यात सोनाक्षी सिन्हाच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती

फसवणुकीच्या गुन्ह्यात सोनाक्षी सिन्हाच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती

सोनक्षी सिन्हाच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सोनाक्षीला अटक सुद्धा करण्यात येणार होती, मात्र अलाहाबाद न्यायालयाने तिच्या अटकेला स्थगिती दिली आहे. पोलिसांना अधिक तपास करण्यासाठी न्यायाधीश नहीर अरा मुनीस आणि विरेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाकडून अटकेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास करावा लागणार असून सोनाक्षीलाही चौकशी करताना पोलीसांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?

दिल्लीमध्ये ३० डिसेंबर रोजी ‘इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड’ या कार्यक्रमासाठी सोनाक्षी सिन्हा हिला आमंत्रित करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यात नृत्य सादर करण्यासाठी सोनाक्षी हजर राहणार होती. इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड या कार्याक्रमासाठी विशेष म्हणजे तिला ३७ लाख रुपये मानधन देण्यात आले होते. मात्र कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी सोनाक्षीने कार्यक्रमामध्ये येण्यास नकार दिला. तिने कार्यक्रमासाठी घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी २२ फेब्रुवारीला सोनाक्षी विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रार करूनही तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी विष प्राशन सुद्धा केले होते. वेळेत उपचार झाल्यामुळे त्याचा जीव वाचला होता. तसेच सोनाक्षीसोबत टॅलेंट फुल ऑफ कंपनीचे अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धूमिल ठक्कर, अॅडगर सकारिया यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

First Published on: March 9, 2019 6:04 PM
Exit mobile version