श्रीदेवीचा मृत्यू बुडून नव्हे, हत्या; केरळच्या डीजीपींचा दावा!

श्रीदेवीचा मृत्यू बुडून नव्हे, हत्या; केरळच्या डीजीपींचा दावा!

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीदेवीच्या अभिनयाचं वलय जितकं गर्द होतं, तितकंच गूढ तिच्या मृत्यूचं देखील कायम आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईतल्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवीचा अकाली मृत्यू झाला. कालौघात तिचा मृत्यू हॉटेलच्या रुममधल्या बाथरूममध्ये बुडाल्यामुळे झाल्याचं समोर आलं. दुबईतल्या फॉरेन्सिक विभागानं तसा अहवाल दिल्यामुळे ते ‘सिद्ध’ देखील झालं. त्यामुळे तिचा मृतदेह भारतात आणून त्यावर रीतसर अंत्यसंस्कार देखील झाले. मात्र, आता तिच्या मृत्यूनंतर जवळपास दीड वर्षानं तिच्या मृत्यूबाबत एक खळबळजनक दावा करण्यात येत आहे. आणि हा दावा दुसऱ्या-तिसऱ्या कुणी केला नसून प्रत्यक्ष केरळचे डीजीपी (तुरुंग) ऋषीराज सिंह यांनीच केल्यामुळे त्या दाव्याला नक्कीच वजन असल्याचं सांगितलं जात आहे! त्यामुळे श्रीदेवीच्या मृत्यूवर नवी चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे दावा?

ऋषीराज यांनी केरळमधल्या ‘केरला कौमुदी’ या वर्तमानपत्रामध्ये लिहिलेल्या स्तंभामध्ये हा दावा केला आहे. खरंतर त्यांचा हा स्तंभ त्यांचे दिवंगत मित्र आणि प्रसिद्ध फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. उमादथन यांच्याविषयी होता. मात्र, त्यामध्ये उमादथन यांनीच केलेल्या दाव्याचा आधार घेऊन ऋषीराज सिंह यांनी श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल खळबळजनक दावा केला आहे. ‘उमादथन यांच्याशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी श्रीदेवीचा मृत्यू अपघाती नसून हत्याच असण्याची शक्यता वर्तवली होती’, असं ऋषीराज यांनी या लेखात म्हटलं आहे.


हा फोटो पाहिलात का? – ‘झिरो’च्या सेटवरील श्रीदेवींचा अखेरचा फोटो व्हायरल!

असं कसं शक्य आहे?

‘उमादथन यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘कितीही मद्य प्यायलं तरी अवघ्या एक फुटांच्या बाथटबमध्ये कुणाचा बुडून मृत्यू होणं अशक्य आहे. त्यामुळे तिचा अपघाती मृत्यू नसून ती हत्या असण्याची शक्यता आहे. तिचे पाय कुणीतरी धरून ठेवले असतील आणि डोकं दाबलं असेल, म्हणून तिचा मृत्यू झाला असेल’, असं ऋषीराज यांनी या लेखात म्हटलं आहे.

या दाव्यावर बोनी कपूर म्हणतात…

दरम्यान, ऋषीराज यांनी केलेला हा दावा तपासून पाहाण्यासाठी उमादथन हे आत्ता हयात नसले, तरी डीजीपी दर्जाच्या एखाद्या अधिकाऱ्याने अशा प्रकारचा दावा केल्यामुळे आणि तो दावा अजूनही गूढ असलेल्या श्रीदेवीच्या मृत्यूबाबत असल्यामुळे त्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ‘अशा प्रकारचे निराधार दावे येतच असतात. त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. तो कल्पनाविलास असू शकतो’, असं बोनी कपूर म्हणाले आहेत.


हेही वाचा – श्रीदेवींची आठवण निघाली अन् भावूक झाले बोनी कपूर
First Published on: July 12, 2019 9:06 PM
Exit mobile version