‘आनंद कारज’मुळे दीप-वीरचं लग्न अडचणीत?

‘आनंद कारज’मुळे दीप-वीरचं लग्न अडचणीत?

प्रातिनिधिक फोटो (सौ-सोशल मीडिया)

नुकतेच लग्नबंधनात अडकलेले दीप-वीर अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आज सकाळी बंगळुरुला रवाना झाले. बंगळुरूमध्ये त्यांच्या लग्नाचं पहिलं ग्रँड रिसेप्शन संपन्न होणार आहे. इटलीमध्ये शाही विवाह केल्यानंतर दीपिका आणि रणवीर गेल्या रविवारी मुंबईमध्ये परतले. त्यानंतर आज हे जोडपं रिसेश्पनसाठी बंगळुरूला रवाना झाले. १४ आणि १५ नोव्हेंबरला झालेलं दीपवीरचं ग्रँड वेडिंग संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरलं. जगभरातील लाखो लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला. इतकंच नाही तर लग्नानंतर दोन दिवसांनी समोर आलेले त्यांच्या लग्नाचे फोटोही वाऱ्यासारखे व्हायरल झाले आणि पाहता पाहता दीप-वीरचं लग्न संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनलं. मात्र, आता दीपिका आणि रणवीर लग्न काहीसं अडचणीत आल्याचं चित्र आहे. ‘द ट्रिब्युन’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘द ट्रिब्युन’च्या वृत्तानुसार इटलीमधील एका शिख संघटनेकडून दीपिका आणि रणवीरच्या लग्नावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दीप-वीरने इटलीमध्ये कोंकणी आणि सिंधी (शिख) अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. मात्र, १५ नोव्हेंबरला झालेल्या सिंधी पद्धतीचा विवाहसोहळा म्हणजेच ‘आनंद कारज‘वर इटलीच्या एका शिख संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

‘आनंद कारज’ म्हणजे नेमकं काय? 

उपलब्ध माहितीनुसार, शीख समुदायात विवाहबद्ध होण्याच्या प्रथेला ‘आनंद कारज’ असं म्हटलं जातं. सहसा अशाप्रकरचा विवाह सोहळा गुरुद्वारामध्ये पार पडतो. वर आण वधू गुरुद्वारामध्ये जातात आणि गुरु ग्रंथसाहेबसमोर बसतात आणि नंतर सर्व विधी पार पडतात. त्यानंतर गुरु ग्रंथसाहेबाभोवती फेरे घेतले जातात आणि त्यावेळी सहजीवनाचं वचन दिलं जातं.

आक्षेप का आणि कशावर?

समोर आलेल्या वृत्तानुसार, दीपिका आणि रणवीर त्यांच्या लग्नासाठी Brescia येथील गुरुद्वारातून गुरु ग्रंथसाहेब हा धार्मिक शिख ग्रंथ घेऊन, तो १५० किमी अंतरावर असलेल्या लेक कोमो येथील पॅलेसमध्ये नेण्यात आला. याठिकाणीच दीपवीरने शिख/सिंधी पद्धतीने विवाह केला. मात्र, नेमक्या याच गोष्टीवर आक्षेप नोंदावण्यात आला आहे. इटलीतील भारतीय शीख समुदायाचे अध्यक्ष सुखदेव सिंग कांग यांनी ‘आनंद कारज’मध्ये अनेक चुका झाल्याचं सांगितलं आहे. सिंग कांग यांनी म्हटलंय की, अकाल तख्तमध्ये सांगितल्यानुसार आनंद कारजसाठी गुरु ग्रंथसाहेब कोणत्याही हॉटेल, बँक्वेट हॉल किंवा अन्य  ठिकाणी नेण्यास अनुमती नाही. मात्र, याचं उल्लंघन करत दीपवीरने गुरुद्वाऱ्यातून गुरु ग्रंथसाहेब बाहेर नेण्यावर कांग यांनी आक्षेप नोंदावला आहे. दरम्यान,  शीख समुदायाच्या संघटनेकडून अकाल तख्तशी संबंधितांकडे याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
First Published on: November 20, 2018 2:31 PM
Exit mobile version