कलाकारांच्या तक्रारी असल्यास मी मालिका सोडेन : दिग्दर्शक सावर्देकर

कलाकारांच्या तक्रारी असल्यास मी मालिका सोडेन : दिग्दर्शक सावर्देकर

नाशिक: सेटवर येताना कलाकार स्वतःचा बडेजाव घेऊन आला तर ते चांगलं नसतं. स्क्रिप्ट हातात मिळाली नाही, या क्षुल्लक कारणावरुन निवास मोरेंनी माझ्या असिस्टंटवर हात उगारला. त्याला शिवीगाळही केली. त्याचं फुटेजही माझ्याकडे आहे. त्यामुळे माझा संताप झाला. अन्य कलाकारांचा जो नियम आहे, तोच मोरेंनादेखील पाळावा लागेल. माझ्या कलाकारांच्या माझ्याविषयी काही तक्रारी असतील तर प्रसंगी मी मालिका सोडेन, अशा शब्दांत दिग्दर्शक अमित सावर्देकर यांनी आरोप फेटाळून लावले.

आरोप करताना आपण स्वतः कुठे चुकलो, हे त्यांनी पाहिले पाहिजे. विशेष म्हणजे आज दुपारी मला स्वतः मोरेंचाच मेसेज आला, की तुम्ही जेवायला कधी येताय. हा कोणता प्रकार? एक दिवस १८ तास शूट झालं. कारण, एपिसोड वेळेवर पोहोचण्याचे आव्हान होते. त्यातच गणेशोत्सवही होता. त्यामुळे कलाकारांना त्यांचा वेळ मिळणे गरजेचे होते. शूट आणि एडिटमध्ये मी स्वतः फक्त दोन तास झोपू शकलो.

मोबदला मिळत नसेल तर हा शो त्यांनी का घेतला? अ‍ॅग्रीमेंट झालं तेव्हाच त्यांनी नकार दिला असता. माझ्या कुणाही कलाकाराची तशी तक्रार नाही. माझी वागणूक कशी आहे हे हार्दीक जोशीपासून कुणालाही विचारा. प्रश्न जेवण आणि अन्य सुविधांबाबत असेल तर मी ठामपणे सांगतो की, आजवर कोणत्याही सेटवर एवढं चांगलं जेवण मिळालं नाही. आम्ही जिथे शूट करतोय ते राहतं घर आहे. त्यामुळे जी मेकअप रुम आहे, तिथेच चेंजिंग करावं लागतं. पण, महिला आत असताना पुरुष बाहेर असतात, हे वेगळं सांगायला नको.

कलाकारांसमोर कधीही अश्लिल भाषेचा वापर होत नाही. अपशब्द वापरला असेल तर कोणत्याही महिला कलाकाराला विचारा. या पोस्टनंतरही मी कलाकारांशी बोललो. मात्र. त्यांची कोणतीही तक्रार नाही. कलाकार वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, याचं भान ठेवावंच लागतं.

First Published on: October 8, 2021 11:59 PM
Exit mobile version