प्रायोगिक रंगभूमीची धावपळ शमली

प्रायोगिक रंगभूमीची धावपळ शमली

Drama

संगीत नाटकाच्या प्रवासाला उतरती कळा लागली आणि नव्याने येणार्‍या लेखक, दिग्दर्शकांना, प्रेक्षकांना आकर्षूण घेण्यासाठी नव्या कथांचा शोध घेणे गरजेचे वाटले. गेल्या पन्नास वर्षांतील नाटकांचा मागोवा घेतला तर प्रत्येक एका दशकात नव्या विषयाची, सादरीकरणाची लाट ही आलेली आहे. अर्थात यात व्यावसायिक दृष्टीकोन अधिक होता. त्यामुळे मनात असून सुद्धा काही चांगले करता येत नव्हते. चिंतनशील, शोध घेतलेले विषय ज्यात काही सांगायचे आहे अशी नाटके रंगमंचावर यावीत याचा ध्यास घेतलेले लेखक, दिग्दर्शक त्यावेळी होते तसे अशा विचारसरणीचे कलाकारही होते. चोखंदळ पण मोजक्या प्रेक्षकांना अशी प्रायोगिक नाटके आवडत होती. कुठलाही आर्थिक दृष्टीकोन न ठेवता प्रयोग करण्याची तयारी दाखवली तर स्वत:बरोबर प्रेक्षकांनाही समाधान देऊ शकतील अशा नाटकांची निर्मिती करणे शक्य आहे हे मुंबई- पुणे इथल्या रंगकर्मींना सुचले आणि यातून प्रायोगिक रंगभूमीची वाटचाल सुरू झाली. हे जरी खरे असले तरी त्यासाठीसुद्धा स्वतंत्र रंगमंच असायला हवा हे जाणवायला लागले. याच कालखंडात जी तीन चार प्रायोगिक नाटकांसाठी नाट्यगृहे उपलब्ध होती, त्यात सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेली ‘अविष्कार नाट्य संस्था’ प्रायोगिक चळवळीसाठी ओळखली गेली. दादरच्या छबिलदासमध्ये ही चळवळ राबवली जात होती.

नाना पाटेकर, अमोल पालेकर, विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू अशा काही ज्येष्ठ रंगकर्मींनी मुंबईत या प्रायोगिक रंगभूमीला गती दिली तर पुण्यामध्ये सतीश आळेकर, जब्बार पटेल, मोहन आगाशे या ज्येष्ठांनी प्रायोगिक रंगभूमीला वेळ देणे सुरू केले. पुण्यामध्ये या चळवळीला व्यापक अशी गती आलेली आहे. मुंबईतही काही प्रमाणात प्रायोगिक चळवळ होत असली तरी अशा प्रयोगासाठी जो अपेक्षित रंगमंच हवा असतो तो उपलब्ध नसल्यामुळे प्रायोगिक नाटके करणे अवघड जात आहे. प्रायोगिक नाटकाचे वैशिष्ठ्य म्हणजे लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी जरी मानधन न घेता काम करण्याची तयारी दाखवली तरी या नाटकासाठी आवश्यक असणारी वेशभूषा, नेपथ्य याचा खर्च मोठा असतो. त्यातून तालमीसाठी जागा आणि त्याशिवाय प्रत्यक्ष रंगमंचावर नाटक सादर करणे तसे अवघड असते. व्यावसायिक रंगमंचावर प्रायोगिक नाटके करायची झाली तर सर्वच संस्थांना खर्च परवडेलच असे नाही. त्यातूनही काही संस्था तडजोड करून प्रायोगिक नाटके करत असतात.

झी मराठी आणि अन्य संस्था यांचे आभार मानावे लागतील. सध्याचे युग हे जाहिरातबाजीचे आहे. पुरस्कार सोहळ्यात कोण सेलिब्रिटी कलाकार येतो यावर पुरस्कार सोहळ्याला प्रेक्षकांचे येणे हे अवलंबून असते. अशा स्थितीतही नाटक, चित्रपट यांच्यासाठी व्यावसायिक दृष्टीकोनातून कलाकृती सादर करणार्‍यांसाठी जशी स्पर्धा घेतली जाते तशी झी मराठीने व अन्य संस्थांनी प्रायोगिक नाटकासाठी स्पर्धाही घेतलेली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रायोगिक नाटक अस्तित्वात आहे. त्यात या स्पर्धा आयोजित करणार्‍या संस्थांचे आभार मानावे लागतील. यासाठी जे परीक्षक नेमले जातात त्यांचेही कौतुक करावे लागेल. प्रायोगिक नाटकाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. त्यांना दिलासा देण्यासाठी आयोजक संस्था एकाच ठिकाणी नाट्यसंस्थांना निमंत्रित करून आयोजक, परीक्षक एकत्रितपणे हे नाटक पाहत असल्यामुळे प्रायोगिक नाटक करणार्‍यांना ते सोईचे झालेले आहे. त्यांनी दिलेले नियम पाळणे एकवेळा सोपे असते, परंतु परीक्षकांच्या वेळेप्रमाणे थिएटर मिळवणे अडचणीचे असते. अनेक आयोजकांचे स्पर्धक एकत्र आल्यामुळे ही अडचण सध्यातरी भासत नाही.

अविष्कार जागेच्या शोधात
प्रायोगिक रंगभूमीसाठी अविष्कारने अनमोल कार्य केलेले आहे. सुरुवातीला छबिलदासमधून प्रायोगिक चळवळ राबविली जात होती. पुढे महानगरपालिकेने माहीम इथल्या एका शाळेमध्ये अविष्कारसाठी जागा दिली होती. कार्यालय, छोटेखानी नाट्यगृह असे त्याचे स्वरूप होते. मधल्या काळामध्ये शैक्षणिक, सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांना पालिकेचे वर्ग उपलब्ध करून दिले होते. भाजपचे सरकार आले आणि अशा कार्य करणार्‍या संस्थांचा मागोवा घेऊन त्यातल्या काही संस्थांना पुढे वर्ग नाकारले गेले. तशी काहीशी नोटीस अविष्कारचे काम पाहणार्‍या अरुण काकडे यांनाही दिली गेली. त्यामुळे याही शाळेत प्रयोगिक चळवळ रबविणे कठीण झालेले आहे. शासन, महानगरपालिका, संबंधित अधिकारी यांच्याकडे गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहेत. त्यांनी सुचवलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे, परंतु आशा निर्माण व्हावी असे चिन्ह दिसत नाही. अविष्कार एकीकडे चळवळ राबवित असताना काकडेकाका स्वत: अविष्कारसाठी जागेचा शोध घेत आहेत.

First Published on: February 18, 2019 5:30 AM
Exit mobile version