गुढीपाडवा सेलिब्रेशन

गुढीपाडवा सेलिब्रेशन

गुढीपाडवा सेलिब्रेशन

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचे स्वागत. गिरगाव, लालबाग, पार्ले, डोंबिवली या ठिकाणी मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. काढल्या जाणार्‍या शोभायात्रेत मराठी परंपरेचे, संस्कृतीचे दर्शन घडवणे हे या शोभायात्रेचे खास वैशिष्ठ्य राहिलेले आहे. त्याचे प्रतिबिंब छोट्या पडद्यावरही तेवढ्याच नव संकल्पनेत दिसायला लागते. शुभ दिवस म्हणून चित्रपटसृष्टीनेसुद्धा या दिवसाचे महात्म्य ओळखलेले आहे. चित्रपट, मालिका यांचे प्रमोशन अशाच सोहळ्यात जास्त होताना दिसते. त्यामुळे गुढीपाडवा सेलिब्रेशन असे काहीसे वातावरण मनोरंजन माध्यमात दिसते.

स्टार प्रवाहवर दाखवल्या जाणार्‍या ललीत-205 आणि छत्रीवाली या मालिकांच्या सेटवर कलाकारांनी गुढीपाडव्याचा आनंद घेतला. ते या मालिकेत पहायला मिळणार आहे. अर्थात सुरू असलेल्या कथानकात गुढीपाडवा सणाचे महत्त्व कसे वाढेल हे दिग्दर्शकाने पाहिलेले आहे. पारंपरिक पद्धतीने गुढीची केलेली पूजा हा प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग असणार आहे. झी-टॉकीजने तर गुढीपाडवा या दिवशी प्रेक्षकांना असलेली सुट्टी अधिक मनोरंजक करण्याचे ठरवलेले आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दे धक्का, आम्ही सातपुते, हुप्पा हुय्या, माझा छकुला, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा हे चित्रपट या वाहिनीवर दाखवले जाणार आहेत. जजमेंट हा समीर सुर्वे दिग्दर्शित चित्रपट आहे जो पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. गुढीपाडव्याचे निमित्त घेऊन या चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ एकत्र आले होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आणि हिंदू नववर्षाची सुरुवात चित्रपटाला लाभदायक ठरो हा त्यापाठीमागचा मुख्य हेतू होता.

First Published on: April 5, 2019 4:05 AM
Exit mobile version