इस्त्रायलचे तंत्रज्ञ मुंबईत दाखल

इस्त्रायलचे तंत्रज्ञ मुंबईत दाखल

छोट्या पडद्याचा विस्तार हा काही भारतापुरता मर्यादीत राहिलेला नाही. भारतातील अनेक कार्यक्रम विविध देशांत पाहिले जातात. त्याचा परिणाम झालेला आहे, तो म्हणजे यातून सांस्कृतिक देवाण-घेवाण ही वाढलेली आहे. रिअ‍ॅलिटी शो कोणताही असो, तो जेव्हा जागतिक पातळीवर आयोजित केला जातो, तेव्हा विविध देशातील कलाकार या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेत असतात. भारतातील कितीतरी रिअ‍ॅलिटी शोमध्ये परदेशातील कलाकारांनी आपले नशीब आजमावलेले आहे. पण या प्रयत्नात परदेशातील तंत्रज्ञ मुंबईत मुक्काम करून एखादा रिअ‍ॅलिटी शो हाताळतील अशी कल्पना करता येत नाही. त्याला कारण म्हणजे परदेशात शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले तंत्रज्ञ आज मुंबईत उपलब्ध आहेत. असं असताना हिंदी कलर्स वाहिनीवर 16 मार्चपासून रायझिंग स्टार हा संगीतविषयक कार्यक्रम सुरू होत आहे. त्यासाठी पंचेचाळीस तंत्रज्ञ काम करीत आहेत. यात दहा-बारा तंत्रज्ञ हे इस्त्रायलवरून मुंबईत दाखल झालेले आहेत.

भारतात तंत्रज्ञ असताना इस्त्रायलच्या टीमला मुंबईत बोलवण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण होतो. रिअ‍ॅलिटी शोमध्ये अलिकडे प्रेक्षकांनासुद्धा सामावून घेतले जाते. स्पर्धकाला वोट देण्याचा आग्रह धरला जातो; पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही तासांचा अवधी द्यावा लागतो. नव्या तंत्रज्ञानाने कार्यक्रम सुरू असतानाच प्रेक्षकांचा काय प्रतिसाद आहे हे कळणे शक्य झालेले आहे. इतकेच काय तर कुठल्या राज्यातून स्पर्धकाला वोट अधिक मिळतात हे जाणून घेणे सोपे झालेले आहे. ही तांत्रिक बाजू भारतीयांबरोबर इस्त्रायल तंत्रज्ञ सध्या हाताळत आहेत. प्रमोशनचा भाग म्हणून सहभागी गायक कलाकारांसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गायक, संगीतकार शंकर महादेवन, नीती मोहन, सूत्रसंचालक आदित्य नारायण, नीना एलाविया जयपूरिया सहभागी झाले होते. रायझिंग स्टार या रिअ‍ॅलिटी शोचे हे तिसरे पर्व आहे.

First Published on: March 15, 2019 4:26 AM
Exit mobile version