‘आणि…काशिनाथ घाणेकर’ येतोय

‘आणि…काशिनाथ घाणेकर’ येतोय

काशीनाथ घाणेकर ७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते… ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येणार आहेत. वायकॉम 18 मोशन पिक्चर्स दिवाळीच्या मुहूर्तावर “आणि …. काशिनाथ घाणेकर” या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

सुबोध भावे साकारणार घाणेकर

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे, अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. रायगडाला जेंव्हा जाग येते, गारंबीचा बापू अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. घाणेकरांचं जबरदस्त व्यक्तिमत्व अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे साकारणार असून या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सुमित राघवनदेखील असणार आहे. ७ नोव्हेंबरला सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होईल. १९६० च्या दशकावर हा चित्रपट आधारित असून “आणि काशिनाथ घाणेकर” मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

कोण होते काशीनाथ घाणेकर?

काशीनाथ घाणेकर हे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाव. मराठी रंगभूमीला काशीनाथ घाणेकर यांनी वैभव मिळवून दिले. मराठी रंगभूमीला काशीनाथ घाणेकर यांनी एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवले. महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा प्रवास विलक्षण आणि थक्क करणारा आहे. हाच प्रवास रुपेरी पडद्यावर येत आहे.

First Published on: June 21, 2018 6:34 PM
Exit mobile version