दिग्गज अभिनेते ‘अविनाश खर्शीकरांवर’ ठाणे रुग्णालयात उपचार सुरू

दिग्गज अभिनेते ‘अविनाश खर्शीकरांवर’ ठाणे रुग्णालयात उपचार सुरू

दिग्गज अभिनेते अविनाश खर्शीकर यांची प्रकृती चिंताजनक असून ठाण्यातील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अविनाश खर्शीकर यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट, मालिका, नाटकातून रंगभूमी गाजविली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत.

बंदिवान मी या संसारी हा अविनाश खर्शीकर यांचा १९७८ साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट, तसेच माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपली अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. लफडा सदन, सौजन्याची ऐशी तैशी, तुझं आहे तुजपाशी, दिवा जळू दे सारी रात यांसारखी नाटके देखील त्यांनी गाजवली आहेत.

सदाबहार असे अविनाश खर्शीकर यांच्या अभिनयासोबत त्यांच्या स्टाइलची देखील त्या काळी चर्चा होत असे. पहिली दैनंदिन मालिका ‘दामिनीत’ त्यांनी महत्वाची भुमिका साकारली आहे.

First Published on: January 31, 2020 8:16 PM
Exit mobile version