ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर

गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त असलेले अभिनेते रमेश भाटकर (७०) यांनी आज मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट क्षेत्रातील एक बहुरंगी अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात भाटकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तीरेखा साकारली होती.

रमेश भाटकर गेल्या काही दिवसापासून कर्करोगानं आजारी होते त्यांना १६ जानेवारीला एलिझाबेथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. रमेश भाटकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजीपार्क येथे ठेवण्यात येणार असून रात्री १० वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गायक-संगीतकार वासुदेव भाटकर यांच्या घरी ३ ऑगस्ट १९४९ मध्ये भाटकर यांचा जन्म झाला. भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश असून त्यांना हर्षवर्धन नावाचा मुलगा आहे. भाटकर यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘कमांडर’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’, `दामिनी’ या त्यांच्या गाजलेल्या टीव्ही मालिका होत्या. `अश्रूंची झाली फुले’ हे त्यांचे नाटक विशेष गाजले होते. त्यानंतर ‘केव्हा तरी पहाटे’, `अखेर तू येशीलच’, `राहू केतू’, `मुक्ता’ यांसारखी नाटकेही गाजली होती.

`चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी `अष्टविनायक’, `दुनिया करी सलाम’, `आपली माणसं’ यांसारख्या चित्रपटांतूनही काम केले होते. `माहेरची साडी’, `सवत माझी लाडकी’ या चित्रपटांतून ते अधिक प्रकाशझोतात आले. ३० वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची ६९ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या कामाचा उत्साह कायम होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी `तू तिथे मी’, `माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. अशा प्रकारे त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

First Published on: February 4, 2019 5:07 PM
Exit mobile version