गाढवाच लग्न’ मनोरंजनासाठी पुन्हा सज्ज

गाढवाच लग्न’ मनोरंजनासाठी पुन्हा सज्ज

गाढवाचं लग्न

‘ऋणानुबंध कला अविष्कार’ ही अनिल ठोसर यांची नाट्यसंस्था. यंदा गणेशोत्सवाचे निमित्त घेऊन ‘बाबुराव मस्तानी’, ‘लावण्यांची लावण्यवती’, ‘टिकल ते पॉलिटिकल’ हे कार्यक्रम करण्याचे निर्मात्यांनी ठरवले होते. पण प्रत्यक्षात संपर्क साधला जात आहे तो ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यासाठी. खरंतर हे हरिभाऊ वडगावकर यांचे राष्ट्रपती पारितोषिक विजेते लोकनाट्य आहे जे दादु इंदुरीकरांनी अजरामर केलेले आहे.

नंतरच्या काळात मधु कडू, मोहन जोशी, प्रकाश इनामदार इतकेच काय तर चित्रपटाच्या निमित्ताने मकरंद अनासपुरे यांनी ही कलाकृती अजरामर केली आहे. तरीही या लोकनाट्याचा आयोजकांकडून आग्रह धरला जात आहे. एकतर ही अस्सल गावरान मातीतील मराठी ठसक्यातील लोकनाट्य आहे. अभिनय, संगीत, नाट्य, नृत्य यांचा एकत्रित अविष्कार यात पहायला मिळतो. सामान्यांपासून ते अगदी बुद्धीजीवी प्रेक्षकांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करु शकेल इतके सामर्थ्य या लोकनाट्यात आहे. संजय कसबेकर दिग्दर्शित या नाट्यात कुंभाराची मुख्य भूमिकाही त्यानेच निभावलेली आहे. यापूर्वी अनेक लोकनाट्यात काम करुन संजयने आपला गावरान ठसा भूमिकेतून उमटवलेला आहे. यंदाच्या उत्सवात ‘गाढवाचंच लग्न’ व्हायला हवं, असा आयोजकांनी आग्रह धरला आहे. सावळा कुंभारची भूमिका करणारा संजय कसबेकर याने एकीकडे चित्रपटात काम करुन दुसरीकडे या लोकनाट्याला वेळ देण्याची तयारी दाखवलेली आहे. श्रद्धा साटम ही यात गंगीची व्यक्तिरेखा साकार करते आहे.

सध्या ‘विठू माऊली’ ही तिची मालिका अतिशय गाजते आहे ज्यात ती पुंडलिकाच्या सासूची व्यक्तिरेखा साकार करित आहे. यातील दिवाणजीच्या भूमिकेसाठी सचिन माधव याला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. याशिवाय राजू नाक्ती, यशवंत शिंदे, साक्षी नाईक, चांदणी देशमुख यांचाही यात सहभाग आहे. एकंदरीत ‘गाढवाच लग्न’ मनोरंजनासाठी सज्ज झालेले आहे. निखळ विनोद, मनमुराद आनंद, चटकदार लावणी पुन्हा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. चारुशिला ठोसर सादर करीत असलेल्या या लोकनाटकासाठी दादा परसनाईक यांचे पार्श्वसंगीत लाभलेले आहे. प्रवीण गवळी याने नेपथ्याची तर भाई सावंत यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारी स्वीकारलेली आहे.

First Published on: August 21, 2018 3:30 AM
Exit mobile version