‘आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर’ चित्रपटाचा फस्ट लुक

‘आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर’ चित्रपटाचा फस्ट लुक

डॉ. काशीनाथ घाणेकरांचा जीवनपट

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार आणि चित्रपटातील अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये अजरामर राहिलेले कलाकार डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपटाचा फस्ट लुक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. ‘आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर’ असे या चित्रपटाचे नाव असून अभिनेता सुबोध भावे या नटश्रेष्टीही भूमिका साकारणार आहे. त्याने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. वायकॉम १८ मोशन पिक्चर्स यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत शिरीष देशपांडे यांनी केले आहे.

सुबोध भावे यांनी पोस्टसोबत, “प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचे आयुष्य येत्या दिवाळीत मोठया पडद्यावर उलगडणार! २०१८ च्या आरशात रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा मागोवा.”, असे लिहिले आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शीत होत आहे.

सुबोधच्या बायोपिकची हॅट्रीक

मराठी कलाक्षेत्रातील दमदार अभिनेता सुबोध भावे या चित्रपटाच्या निमित्ताने तिसऱ्यांदा बायोपिकमध्ये दिसणार आहे. त्याने यापूर्वीही दोन बायोपिकमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नितीन देसाई यांच्या ‘बालगंधर्व’ चित्रपटात बालगंधर्व तर नीना राऊत यांच्या ‘लोकमान्य… एक युगपुरूष’ चित्रपटात त्यांनी लोकमान्य टिळक यांची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा सुबोध एका लेजन्टचे जीवनपट रुपेरी पडद्यावर साकारणार असून त्याच्या रुपाने नव्या युगातील प्रेक्षकांना अभिनेता काशीनाथ घाणेकर यांची ओळख होणार आहे.

नाटक, चित्रपटातील भूमिका गाजल्या

ज्येष्ठ कलाकार डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कितीतरी भूमिका अजरामर झाल्या आहेत. यामध्ये ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मधुमंजिरी’ या नाटकांचा समावेश आहे. तर ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘पडछाया’, ‘अभिलाषा’, ‘मराठा तितुका मेळावा’, ‘भव्य’, ‘पाठलाग’, ‘झेप’, ‘मधुचंद्र’, ‘देव माणूस’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

First Published on: August 27, 2018 3:44 PM
Exit mobile version