‘मिर्झापूर २’चा टीझर प्रदर्शित!

‘मिर्झापूर २’चा टीझर प्रदर्शित!

अॅमेझॉन प्राइमवरील ‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेब सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागानंतर या वेब सीरिजच्या सिक्वलची जोरदार मागणी झाली होती. अखेर पहिल्या सिझनला एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर अॅमेझॉन प्राइमने ‘मिर्झापूर २’चा टीझर प्रदर्शित केला आहे. अवघ्या १५ सेकंदांच्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढणार आहे.

‘जो आया है वो जाएगा भी, बस मर्जी हमारी होगी’, हा कालिन भैय्याच्या आवाजातील संवाद या टीझरमध्ये ऐकायला मिळतो. ‘मिर्झापूर’मध्ये कालिन भैय्याची भूमिका अभिनेता पंकज त्रिपाठीने साकारली होती. कालिन भैय्यासोबतच, गुड्डू आणि मुन्ना त्रिपाठी या भूमिका प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय झाल्या. अली फजल गुड्डूच्या तर दिव्येंदू शर्मा मुन्ना त्रिपाठीच्या भूमिकेत होते.

‘मिर्झापूर २’ टीझरच्या निमित्ताने पंकजने इन्स्टाग्रामवर देखील पदार्पण केलं आहे. टीझरची पहिली पोस्ट पंकजने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला भाग प्रदर्शित झाला होता. २०२० मध्ये हा दुसरा सिझन प्रदर्शित होणार आहे.

First Published on: November 16, 2019 4:39 PM
Exit mobile version