मिर्झापूरचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

मिर्झापूरचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

पोस्टर (सौजन्य - इंडियन एक्सप्रेस)

सध्या सर्वत्र वेब सीरिजचे वारे वाहत आहे. नेटफ्लिक्ससोबत आता अॅमेझॉन प्राईमदेखील या स्पर्धेत उतरले आहे. नेट्फ्लिक्सप्रमाणे अॅमेझॉन प्राईमही आता स्वतःच्या वेबसीरिज लोकांसमोर आणत आहे. अॅमेझॉन प्राईमने एक नवी वेब सीरीज आणली आहे. नुकताच तिचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फझल, विक्रांत मेसी, दिव्येंदू शर्मा, कुलभूषण खरबंदा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, रसिका दुगल, हर्षिता गौर आणि अमित सियाल यांच्या भूमिका पहायला मिळणार आहेत. मिर्झापूर असे या वेबसीरिजचे शीर्षक असणार आहे.

या सीरिजची कथा ”बळी तो कान पिळी’ हा न्याय चालणाऱ्या मिर्झापूर येथे घडते. ही कथा अमली पदार्थ, शस्त्र आणि सत्तेचे राजकारण यांभोवती फिरणारी आहे. करण अंशुमन आणि पुनीत कृष्णा यांची निर्मिती असलेली व गुरमित सिंग यांनी दिग्दर्शित केलेली मिर्झापूर ही नऊ भागांची मालिका १६ नोव्हेंबरपासून २०० हून अधिक देश तसेच प्रदेशात केवळ प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केली जाणार आहे. प्रेक्षकांना सावरून बसायला लावणारा तरीही खिळवून ठेवणारा अनुभव देणारी मिर्झापूर म्हणजे नावाजलेल्या तसेच पुरस्कार विजेत्या अभिनेत्यांनी प्रत्यक्षात आणलेली पकड घेणारी कहाणी आहे.अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाचे संचालक आणि प्रमुख विजय सुब्रमण्याम याबाबत म्हणाले, “नवीन, चाकोरीबाह्य मालिका भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी आणण्याची आमची वचनबद्धता आम्ही मिर्झापूर आणून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे कथनाच्या दृष्टीने स्थानिक तरीही जागतिक व्यासपीठावरही भव्य भासणाऱ्या भारतातील कथा आम्ही मांडणार आहोत.

कशी आहे मिर्झापूर

सत्तेच्या मोहाने झपाटलेल्या आणि शेवटी त्यातच संपून जाणाऱ्या दोन भावांचा प्रवास दाखवणारी मिर्झापूर ही मालिका म्हणजे भारताच्या केंद्रस्थानाचे तसेच तरुणाईचे जिवंत चित्र आहे. यातील जग अमली पदार्थ, शस्त्र आणि बेकायदा कृत्यांनी भरलेले आहे. यात जात, सत्ता, अहंकार आणि स्वभाव एकमेकांना छेद देत राहतात आणि हिंसाचार हा जगण्याचा एकमेव मार्ग आहे. असेच या कथेतल्या प्रमुख पात्रांना वाटत असते.

वाचा – ईशा अंबानीच्या संगीत सोहळ्यात गाणार बियोन्से

First Published on: October 23, 2018 5:14 PM
Exit mobile version