नृत्यांगणा मृणालिनी साराभाई गुगल-डुडलवर!

नृत्यांगणा मृणालिनी साराभाई गुगल-डुडलवर!

मृणालिनी साराभाई यांचे गुगल-डुडल

शास्त्रीय नृत्यांगणा, कोरिओग्राफर आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त मृणालिनी साराभाई यांची आठवण आज गुगल- डुडलने करुन दिली. मृणालिनी यांच्या १०० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनोखे गुगल-डुडल ठेवत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

वयाच्या पाचव्या वर्षापासून मृणालिनी साराभाई यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. ‘आपण नर्तिकाच होणार’, हे त्यांनी घरात ठामपणे सांगून टाकले. ज्या वयात मूलं खेळण्यांमध्ये रमतात, त्या वयात त्यांचे मन फक्त नृत्यात रमले, हे त्यांनी त्यांच्या ‘द व्हॉईस ऑफ हार्ट’ या आत्मचरित्रात लिहिले आहे. अगदी त्यांनी म्हटल्याप्रमाणेच नृत्यात निपुणता प्राप्त करत त्यांनी जगभरात स्वत:ला शास्त्रीय नृत्यात सिद्ध केले. मृणालिनी या मूळच्या केरळच्या; त्यांचा जन्म ११ मे १९१८ चा, त्यांचे वडील डॉ. एस. स्वामीनाथन मद्रास हायकोर्टात बॅरिस्टर होते. तर आई अम्मू स्वामीनाथन या स्वातंत्रसेनानी होत्या. विशेष म्हणजे त्या संसदेच्या पहिल्या सदस्य होत्या. तर बहीण लक्ष्मी या सुभाषचंद्र बोस यांच्या चळवळीत सहभागी होत्या.

विक्रम आणि मृणालिनी साराभा

मृणालिनी यांचे बालपण स्वित्झर्लंडमध्ये गेलं. तेथे त्यांनी ‘डालक्रोझ’ नावाचा नृत्याचा प्रकार शिकला. पण त्या तितक्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या शैलीतील नृत्यप्रकार आत्मसात केले. अमूबी सिंह यांच्याकडून ‘मणिपुरी’, कुंजू कुरुपकडून ‘कथकली’, मिनाक्षी आणि मुथूकुमार पिल्लै यांच्याकडून ‘भरतनाट्यम’चे धडे घेतले. भारतीय कलांमधील बारकावे जाणून घेतल्यानंतर त्या अमेरिकेत परतल्या आणि अमेरिकेत जाऊन त्यांनी ‘ड्रॅमॅटिक आर्टस’चे धडे घेतले.

वयाच्या २४ व्या वर्षी त्या शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्याशी विवाह बंधनात अडकल्या. विक्रम साराभाई प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. दोन वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत दोघे असूनही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साराभाई यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या अहमदाबादला राहू लागल्या. दोन वेगळ्या संस्कृतींशी त्यांनी जुळवून घेतले आणि अहमदाबादमध्ये त्यांनी ‘दर्पण’ नावाची नृत्य संस्था सुरु केली.

मुलगी मल्लिसोबत नृत्य सादर करताना (सौ. हिंदुस्तान टाईम्स)

या संस्थेतून त्यांनी कित्येकांना नृत्याचे धडे दिले. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कलेच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. आजही त्यांचा नृत्याचा वारसा त्यांची मुलगी मल्लिकाने जपली आहे.

१०० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या नृत्य कौशल्याला समोर ठेऊन डुडल तयार करण्यात आले आहे. दिल्लीची ग्राफिक डिझायनर सुदिप्ती टकर यांनी हे अनोखं डुडल तयार करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

First Published on: May 11, 2018 7:56 AM
Exit mobile version