‘महाराजांच्या किल्ल्यात जाऊन शुटींग करायला मिळणं यासारखं भाग्य नाही’

‘महाराजांच्या किल्ल्यात जाऊन शुटींग करायला मिळणं यासारखं भाग्य नाही’

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम देखील केलं. २०१९मध्ये सगळ्यांच्या लक्षात राहिलेली मृणाल कुलकर्णी यांची भूमिका म्हणजे फत्तेशिकस्त या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिका. चित्रपटासोबतच मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटगृहात जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या घरी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. याविषयी बोलताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या,

इतिहास हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे. मी नेहमी असं म्हणते माझे आजोबा प्रख्यात कादंबरीकार गो. नी. दांडेकर ज्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भरभरून प्रेम केलं आणि ते लोकांमध्ये वाटलं. त्यांच्याकडून हा वारसा मला मिळालेला आहे असा मला वाटतं. मी पहिल्यांदा जिजाऊ आऊसाहेबांची भूमिका साकारली आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप जास्त आनंद होतो. एक आई म्हणुन, एक माणूस म्हणुन जिजाऊ आईसाहेबांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. ही भूमिका मी आयुष्यभर जरी करत राहिले तरी मला असं वाटेल कि अजून शिकण्यासारखं खूप आहे. त्यामुळे फत्तेशिकस्त मधील हि भूमिका साकारताना मला अत्यानंद झाला. मला दिग्पाल लांजेकरचा अभिमान वाटतो की त्याने  महाराजांचं चरित्र अत्यंत योग्यरित्या प्रेक्षकांनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

ही घटना अविस्मरणीय

किल्ले राजगडवर आम्ही शुटिंग केलं. ती घटना आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय होती. हा माझा सर्वात आवडता किल्ला आहे. सुमारे २५ वर्ष हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता. या किल्यावर शूटिंग करण्याची संधी मिळाली हा खरोखर अंगावर काटा आणणारा क्षण होता. तिथे जाऊन तोच काळ जागं करणं हा खरंच खूप सुंदर अनुभव होता. आयुष्यभर सर्वांच्या आठवणीमध्ये हा प्रसंग राहील. महाराजांनी हा किल्ला कसा बांधला असेल? महाराज इथून राज्यकारभार कसा सांभाळत असतील? असे अनेक प्रश्न ज्यांनी हा किल्ला पहिल्यांदा चढला त्यांना पडत होते. सर्व कलाकारांनी आपल्या पाठीवर शूटिंगच सर्व सामान घेऊन किल्ला चढला. महाराजांचा इतिहास  समोर येण्यासाठी आपलाही छोटा हातभार आहे हा विचार खूप आनंद देऊन जात होता.


हे ही वाचा – Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नागरिकांनो घरातच थांबा!


 

First Published on: August 5, 2020 9:11 PM
Exit mobile version