नवाजुद्दीनसाठी नववर्ष असणार खास

नवाजुद्दीनसाठी नववर्ष असणार खास

Nawazuddin Siddiqui

नसिरूद्दीन शहा, अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी असे कितीतरी कलाकार आहेत की ज्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आहे. सलग तीन वर्ष योगदान दिल्यानंतर रंगमंचाला आवश्यक अशा सर्वच गोष्टी इथे ज्ञात होतात. जागतिक पातळीवर नाव मिळवणार्‍यांच्या या यादीत आता नवाजुद्दीन सिद्दीकीचेही नाव घेतले जाणार आहे. तोसुद्धा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी आहे. सलग दोनदा एशिया पॅसिफीक स्क्रीन अवॉर्ड मिळवण्यात त्याला यश आलेले आहे. या भारतीय कलाकाराची तुलना या निमित्ताने हॉलिवूडचे अभिनेते हित लेझर आणि एथनी होपकीन्स यांच्याबरोबर केली जात आहे. त्यामुळे नवाजुद्दीनसाठी येणारे नववर्ष आणखीन खास असणार आहे.

‘गँग ऑफ वासेपूर’, ‘कहानी’, ‘तलाश’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘बजरंगी भाईजान’, ‘कीक’, ‘मॉम’, ‘बाबुमोशाई’ ‘बंदुकबाज’ हे चित्रपट नवाजुद्दीनने केले असले तरी बहुचर्चित म्हणून ‘मंटो’ या चित्रपटाकडे पाहिले जाते. समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केलेच परंतु प्रेक्षकांनीही या चित्रपटाला भरभरून दाद दिली. या वर्षात जे काही पुरस्कार त्याच्या वाट्याला आले त्यात ‘मंटो’ची चर्चाही अधिक झालेली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल, सिडनी महोत्सवात नवाजुद्दीनच्या सर्जनशील अभिनयाला समीक्षकांनी दाद दिलेली आहे.

अभिनेत्री नंदिता दास हिचे ‘मंटो’ चित्रपटाच्या मागे प्रभावी विचार दडले होते, ते रूपेरी पडद्यावर मांडण्यात नवाजुद्दीन कुठेही कमी पडलेला नाही. स्वत: नंदिताने अनेक कलात्मक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. भावना आणि वेदनेशी जोडलेल्या कथेला काय आवश्यक असते हे तिने प्रत्यक्ष काम करून ओळखलेले आहे. उर्दूतल्या लेखकाला न्याय देण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश आलेले आहे. नंदिताने या भूमिकेसाठी माझा विचार करावा हीच मुळात आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे त्याने सांगितले.

नवाजुद्दीन सिद्दीकी याला 2019 हे नववर्ष खास असणार आहे. त्यापाठीमागचे कारण म्हणजे ‘सिक्रेट गेम्स’ या त्याच्या वेबसीरिजने त्याला कमालीची लोकप्रियता मिळवून दिलेली आहे. त्याचे कौतुक झालेच परंतु या वेबसीरिजचा दुसरा भागही यावा ही प्रेक्षकांची असलेली इच्छा नव्या वर्षात पूर्ण होणार आहे. गणेश गायतोंडे जो गुन्हेगारी क्षेत्रातला डॉन आहे तो यानिमित्ताने पुन्हा अवतरणार आहे. ‘मोतीचुर चकनाचुर’ यात चक्क रोमॅन्टिक भूमिका तो निभावणार आहे. अभिनेत्री अथिया शेट्टी याची त्याला साथ लाभणार आहे. महाराष्ट्राबरोबर जिथेजिथे म्हणून मराठी माणूस विखुरलेला आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाची प्रतीक्षा करतो आहे. त्यात नवाजुद्दीनने ठाकरेंची वादळी व्यक्तिरेखा साकार केलेली आहे.

First Published on: December 12, 2018 5:05 AM
Exit mobile version