रिया चक्रवर्तीने ६ महिन्यांनंतर केली सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली…

रिया चक्रवर्तीने ६ महिन्यांनंतर केली सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती तब्बल ६ महिन्यांपासून सोशल मीडियापासून दूर होती. आज जागतिक महिला दिनानिमित्त रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने रिया पुन्हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली आहे. तिने आपल्या आईचा हात हातात धरल्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रियाने या शेअर केलेल्या फोटोमध्ये रिया आणि तिची आई संध्या चक्रवर्तीचा हात दिसतोय. हा फोटो शेअर करताना रियाने सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासह तिने असेही म्हटले की आई आणि नेहमीच सोबत… माझी आई माझी शक्ती, माझा विश्वास, माझा धैर्य… यावेळी तिने #love #faith #fortitude #strength #mother #womenwhoinspire #womenempowerment असे हॅशटॅग देखील वापरल्याचे दिसते.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. गेल्या वर्षात ऑगस्ट या महिन्यात रियाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यावेळीच सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय आणि ईडी सोबत तिची चौकशी सुरू होती. रियाचा प्रियकर आणि बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर रिया आणि तिचं कुटुंब देखील या प्रकरणात अडकले होते. दरम्यान सुशांतच्या परिवाराने देखील रियावर गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर रियाला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक देखील केली होती. मात्र आता तिची जामिनावर सुटका झाली आहे.

जामिनावर सुटका झाल्यानंतर रियाने स्वतःला लोकांपासून दूर ठेवले आहे. मात्र तरी देखील ती अनेकदा स्पॉट झाल्याचे बघायला मिळते असे असले तरी तिचा तेवढा सहभाग नसतो. नुकतेच एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात कोर्टात चार्टशीट दाखल केली आहे. या चार्टशीटमध्ये रिया चक्रवर्तीसह साधारण ३३ जणांचे नाव देखील आरोपी म्हणून सहभागी केले आहे. एनसीबीच्यावतीने दाखल करण्यात आलेलं हे आरोपपत्र ३० हजार पानी असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने २०० जणांचे जबाब नोंदवले असून, ३० हजार पानांच्या या आरोपपत्रात १२ हजार पानांची हार्ड कॉपी आणि सीडीमधील पुराव्यांचा देखील समावेश आहे. एनसीबीने दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये ३३ जणांचा समावेश आहे.


First Published on: March 8, 2021 1:34 PM
Exit mobile version