‘कृतांत’ एकाकी जीवन

‘कृतांत’ एकाकी जीवन

Krutant

‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘साने गुरूजी’ अशा कितीतरी मराठी चित्रपटांत दिसलेला पुढे काही हिंदी चित्रपटांत आपला प्रभाव दाखवणारा संदीप कुलकर्णी मधल्या काळात कामात व्यस्त झाला होता. एकतर त्याने स्वत:ची निर्मिती संस्था स्थापन केलेली आहे. महात्मा फुलेंच्या बायोपिक चित्रपटामध्ये तो महात्मा फुलेंची व्यक्तिरेखा साकार करीत आहे. शिवाय निखिल अडवाणीच्या हिंदी चित्रपटात त्याने काम केलेले आहे. संदीपच्या ‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. त्याच्याकडे असलेले चित्रपट लक्षात घेता संदीप हे नाव पुन्हा चर्चेत येणार आहे. त्याची सुरुवात ‘कृतांत’ या चित्रपटापासून सुरू होत आहे ज्यात संदीपने जरा हटके अशी व्यक्तीरेखा साकार केलेली आहे. १८ जानेवारीला प्रदर्शित होणार्‍या चित्रपटाच्या निमित्ताने तो प्रमोशनासाठी बाहेर पडलेला आहे.

संदीप कुलकर्णी हा भूमिकेच्या बाबतीत थोडासा जागरूक आहे. केवळ मुख्य भूमिकेसाठी विचार केला जातो म्हणून भूमिका स्वीकारणे त्याला स्वत:ला मान्य नाही. एकतर त्याच्याकडे आलेले चित्रपट लक्षात घेता पहिल्या पदार्पणातले दिग्दर्शक त्याच्याकडे अधिक आलेले आहेत. प्रत्येक दिग्दर्शकाचा पहिला प्रयत्न शोधक आणि अभ्यासू वृत्तीचा असतो. त्यामुळे अशा दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून चित्रपट स्वीकारणे संदीपला अधिक आवडते. ‘कृतांत’ या चित्रपटाचा दिग्दर्शक दत्ता भंडारे जेव्हा संदीपकडे आला तेव्हा ‘मलाच निवडण्याचे कारण काय’ असा प्रश्न विचारून संदीपने दिग्दर्शकाची परीक्षा घेतली होती. दिग्दर्शकानेही समर्पक उत्तर दिल्यानंतर तीन भेटीतच चित्रीकरणाचे निश्चित झाले.

प्रत्येक माणसाची जगण्याची जीवनशैली ही वेगवेगळी असली तरी गरजा भागवण्यासाठी पैसा हा प्रत्येकाला महत्त्वाचा वाटलेला आहे. पण चिंतन, मनन करणार्‍या आणि स्वत:विषयी जागरूक असणार्‍या व्यक्ती एका ठरावीक वयात आपण जे काही करतो त्यात आपल्या स्वत:च्या आवडीचा किती विचार होतो याचा विचार करायला लागल्यानंतर जे वैभव प्राप्त केले त्याचा त्याग करण्याचीही तयारी या व्यक्ती दाखवतात. ‘कृतांत’ या चित्रपटातला नायक अशाच वृत्तीचा आहे. तो दारिद्य्राचे जीवन जगायला लागतो. या प्रवासात त्याला जे काही अनुभव येतात ते म्हणजे ‘कृतांत’ हा चित्रपट सांगता येईल. संदीपबरोबर सुयोग गोरे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. रेनरोज फिल्म्सच्या वतीने मिहिर शाह याने या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे.

गुगल दत्ताचा गुरू
‘कृतांत’ चित्रपटाचा दिग्दर्शक दत्ता भंडारे याला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी सोलापूरवरून तो मुंबईत दाखल झाला. पण पुढे पैसे नसल्याने डॉक्टर होता येणार नाही याची जाणीव त्याला झाली. पुढचे शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये घेत असताना त्याला इथे रंगमंचाचा मार्ग सापडला. इथल्या एकांकिका स्पर्धेमध्ये भूमिका निभावून स्वत:तल्या कलाकाराला आजमावले. थोडेफार कौतुक होते म्हटल्यानंतर नाटकातच करिअर करण्याचे त्याने ठरवले. आविष्कारच्या दोन नाटकांत तो होता. या निमित्ताने प्रख्यात नाट्य प्रशिक्षक सत्यदेब दुबे यांच्या सान्निध्यात येण्याची संधी त्याला प्राप्त झाली आणि याच बळावर बाहेरच्या व्यावसायिक विश्वात वावरण्याचे त्याने ठरवले. ठेंगणा, गव्हाळ वर्ण अशी काहीशी कारणे देऊन त्याला अनेक ठिकाणी नाकारले गेले. त्याला पर्याय म्हणून भविष्यात आपल्याला दिग्दर्शक होता येईल का हा विचार मनात आला. कोणाकडेही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम न करता ‘गुगल’ला आपला गुरू मानले. भारतीय चित्रपटांबरोबर राष्ट्रीय चित्रपटांचाही अभ्यास केला आणि त्यातून ‘किप पेशन्स’ ही एकांकिका व काही लघुकथा लिहिल्या.

आता पुढची पायरी म्हणून निर्माता शोधणे सुरू केले. हो, नाही यापेक्षा नाहीचीच सवय ही काही वर्षात त्याला झाली होती. मिहिर यांना सात-आठ कथा ऐकवल्या आणि अखेरीस ‘किप पेशन्स’ ही एकांकिका वाचून दाखवली आणि का कोण जाणे त्याने याच एकांकिकेवर चित्रपट करण्याची तयारी दाखवली. ‘कृतांत’ हा दत्ताचा पहिलावहिला व्यावसायिक मराठी चित्रपट आहे. ‘पायंडा’ हा लघुपट त्याने तयार केलेला आहे जो वेगवेगळ्या महोत्सवात दाखवला जाणार आहे.

First Published on: January 9, 2019 5:14 AM
Exit mobile version