लवकरच येणार मुंबई पुणे मुंबई ३

लवकरच येणार मुंबई पुणे मुंबई ३

मुंबई पुणे मुंबई ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर-डूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही देखील यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीचा ‘मुंबई पुणे मुंबई’चा तिसरा भाग आता येत्या ७ डिसेंबर २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहे.

मुंबई पुणे मुंबई-२

‘मुंबई पुणे मुंबई-२’ हा दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधील चित्रपट रसिकांनीही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे हिट मराठी चित्रपट

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म आणि आम्ही दोघी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केले आहे.

मुंबई पुणे मुंबईला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.  – सतीश राजवाडे, दिग्दर्शक

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि अमित भानुशाली ही एकमेकांना पूरक अशी नावे आहेत आणि आम्ही आमच्या पहिल्या चित्रपटापासून हे बंध जपले आहेत. हे नाते अधिक घट्ट करताना आम्ही या चित्रपटाचा पुढचा भाग बनविला. चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची निर्मिती करत असताना हे बंध आणि नाते अधिक दृढ होणार आहे. स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे हे गुणी कलाकार आणि गुणवान दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे.  – संजय छाब्रिया, एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट

First Published on: August 3, 2018 8:33 PM
Exit mobile version