‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेबद्दल निर्माता सुबोध भावेने सांगितली खास गोष्ट!

‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेबद्दल निर्माता सुबोध भावेने सांगितली खास गोष्ट!

लगीनघाई म्हणजे आपल्याकडे जिव्हाळ्याचा विषय. पण, सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊनं बसले आहे ! आतापर्यंत  एका व्हिडिओ कॉलवर सार्‍या भेटीगाठी पार पडत, मन जुळत, मैत्री होत असे. पण, ऑनलाईन लग्नाच्या गाठी जुळतील? एकीकडे वर्‍हाड, नवरा मुलगा एका बेटावर, नवरी मुलगी दुसर्‍याच बेटावर आणि लग्न घडवून आणणारे भटजी तिसर्‍याच स्वतंत्र बेटावर.

लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा आणि ऑनलाईन लग्नाची तारेवरची कसरत म्हणजे कलर्स मराठीवरील नवीन मालिका ‘शुभमंगल ऑनलाईन’…मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशाप्रकारचा लग्नसोहळा रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. शंतनू आणि शर्वरीचा हा ऑनलाईन लग्न सोहळा कसा पार पडेल ? काय गंमती जमती होतील? हे बघण्यासाठी तुम्ही देखील सहभागी व्हा या न्यू नॉर्मल, आगळया वेगळ्या लगीनघाईमध्ये.. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुकन्या कुलकर्णी – मोने, अमिता खोपकर, सायली संजीव, सुयश टिळक, आनंद इंगळे, मिलिंद फाटक, अंकिता पनवेलकर या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

लग्नाच्या मंगलाष्टकांमधला *शुभमंगल सावधान* यातला सावधान हा शब्द सध्या अत्यंत महत्वाचा आहे… आणि यालाच लक्षात घेता शंतनू आणि शर्वरीच्या भेटीगाठी ऑनलाईनच सुरू होतात… शंतनू सदावर्ते महत्वाकांक्षी आणि अतिशय देखणा असा एअर लाईनमध्ये काम करणारा आजच्या पिढीतील तरुण आहे. ज्याचा लग्न करण्याला नकार आहे तर शर्वरी अत्यंत हुशार, स्वभावाने मस्त, बिनधास्त, मनमिळाऊ अशी मुलगी आहे… ‘माणूस वाईट नसतो, परिस्थितीमुळे तो तसा वागतो’असे तिचे एकंदरीतच मत आहे… खरंतर दोघांच्या स्वभावातील विरोधाभास गमतीदार आहे आणि हेच त्यांच्या नात्यातील विशेष आहे… शंतनू आणि शर्वरीचे आयुष्य पूर्णपणे बदलते जेव्हा ऑनलाईन भेटीगाठीतून त्यांचे नाते लग्नाच्या महत्वपूर्ण टप्प्यावर येऊन थांबते… आणि मग दोघांच्या घरात एकच लगबग उडते ‘शुभमंगल ऑनलाईन’. एकीकडे लगीनघाई आणि दुसरीकडे शंतनू – शर्वरीची ऑनलाईन डेट चोरून बघणारी घरातील मंडळी… ऑनलाईन लग्न कसे पार पडेल ? काय काय गंमती होतील ? शंतनू – शर्वरीचे नाते कसे फुलत जाईल ? या आगळया वेगळ्या लग्नात अजून काय काय घडेल ? हे बघणे रंजक असणार आहे.

कार्यक्रमाविषयी बोलताना मालिकेचे निर्माते सुबोध भावे म्हणाले, ‘माणूस एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच वेगवेगळी माध्यमं शोधून काढतो, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष. प्रेम करणाऱ्या शर्वरी आणि शंतनू यांनीही असंच प्रेमाचं वेगळं माध्यम शोधून काढलं आहे, त्याचीच ही गोष्ट ! याआधी बरेचसे ग्राऊंड एवेंट्स प्रोड्यूस केले, सिनेमा केला ‘पुष्पक विमान’ नावाचा पण मालिका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेक दिवस मालिकेची निर्मिती करावी अशी ईच्छा होती पण हवीतशी स्क्रिप्ट मिळत नव्हती… लॉकडाऊनच्या काळात शुभमंगल ऑनलाईन या मालिकेची गोष्ट आली, जी आम्हां सगळ्यांना आवडली आणि ती आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे २८ सप्टेंबरपासून कलर्स मराठीवर. चांगली टिम जमली आहे दिग्दर्शक, कलाकार आणि पडद्यामागची टिम त्यामुळे उत्सुकता आहे. प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी उचललेले पाऊल आता त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे… कलर्स मराठी आणि कान्हाज् मॅजिकचा हा प्रयोग रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल.


हे ही वाचा – मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन!


First Published on: September 23, 2020 10:20 PM
Exit mobile version