अतुल गोगावले लवकरच आता छोट्या पडद्यावर

अतुल गोगावले लवकरच आता छोट्या पडद्यावर

अतुल गोगावले

संगीतकार, गीतकार, तालवादक, पार्श्वगायक अशी ओळख असलेले अजय – अतुल या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. सातत्याने नवनवीन प्रयोग करत, स्वतःला आजमावत या संगीतकार जोडीने मराठीसह बॉलीवूड मध्येही आपली अमिट छाप निर्माण केली आहे. विविध कॉन्सर्टमध्ये आपल्या गाण्याने, तालवादनाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगीतकाराच्या बहारदार अशा भूमिकेतून रसिकांना  मंत्रमुग्ध करणारे अतुल गोगावले लवकरच छोट्या पडद्यावर सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडणार आहेत. एका वृत्तवाहिनीवर प्रजासत्ताक दिनापासून ‘आपले भारतरत्न’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ते करणार असून ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भारतरत्नांची यशोगाथा उलगडणार आहेत.

९ भारतरत्नांची यशोगाथा

या कार्यक्रमातून आम्ही महाराष्ट्र जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या ९ भारतरत्नांची यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेसमोर घेऊन येत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जेआरडी टाटा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर,  नानाजी देशमुख, पांडुरंग काणे या सर्वांची नावं माहित असली तरी त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती अनेकांना नाही, ती देण्याचा प्रयत्न ‘आपले भारतरत्न’ या मालिकेतून करण्यात आला आहे, असे अतुल गोगावले यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ‘भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेल्या अभिवंदनीय व्यक्तिमत्त्वात महाराष्ट्रातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे, त्यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला देणाऱ्या कार्यक्रमाचा भाग मला होता आले याचा खूप आनंद वाटतो’,असे देखील ते पुढे म्हणाले.

हेही वाचा –  Video : ‘या’ अभिनेत्रीला मराठी गायकाने केले प्रपोज व्हिडीओ व्हायरल


First Published on: January 24, 2020 4:34 PM
Exit mobile version