साऊथ आफ्रिकेची जोजिबीनी टुंजी ठरली यंदाची मिस युनिव्हर्स!

साऊथ आफ्रिकेची जोजिबीनी टुंजी ठरली यंदाची मिस युनिव्हर्स!

अमेरिकेच्या अटलांटा येथे नुकत्याच पार पडलेल्या ६८व्या मिस युनिव्हर्स सोहळ्यात तब्बल ९० स्पर्धकांना मात देत साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टुंजी हिने मिस युनिव्हर्स ठरत विश्व सुंदरीचा मुकूट पटकावला. काल रविवारी अमेरिकेतील अटलांटा येथे ६८व्या मिस युनिव्हर्स समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान भारताच्या वर्तिका सिंह हिने स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत धडक मारली.

भारताच्या वर्तिका सिंहचा प्रवास

जोजिबीनी टुंजीसह २० सौंदर्यवतींनी या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. यामध्ये भारताच्या वर्तिका सिंह या सौंदर्यवतीचा देखील समावेश होता. पण वर्तिकाला टॉप १० मध्ये स्थान पटकावता न आल्याने ती स्पर्धेतून बाहेर झाली. कोलंबिया, फ्रांस, आइसलँड, इंडोनेशिया, मेक्सिको, पेरु, पुएर्टो रीको, साऊथ आफ्रिका, थायलँड आणि युनायटेड स्टेटच्या १० सौंदर्यवतींनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

दरम्यान २०१८ची मिस युनिव्हर्स कैटोरिना ग्रे हिने स्पर्धेची विजेती आणि रनरअप ठरलेल्या नावांची घोषणा केली. या स्पर्धेत मेक्सिकोची सोफिया अरागोनने तिसरे स्थान पटकावले. तर दुसऱ्या क्रमांकावर पुएर्टो रीकोची मेडिसन अँडरसन हिच्या नावाची घोषणा झाली. या सर्वांवर मात करत साऊथ आफ्रिकेची जोजिबीनी टुंजी २०१९ ची विश्व सुंदरी ठरली.

पारंपरिक वेशभूषेतील वर्तिकाने जिंकली मनं

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धकांनी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करताना पारंपरिक पोषाख परिधान करत वॉक केला. यावेळी भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वर्तिका सिंह हिने उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी वर्तिका म्हणाली की, “भारतात लहान शहरांमधील मुलींना स्वप्न पाहण्याचा हक्क नाही. पण मी स्वप्न पाहिले. एवढेच नाही तर त्यावर विश्वास देखील ठेवला. आणि कधीच हार मानली नाही.”

कोण आहे जोजिबीनी टुंजी?

२६ वर्षीय जोजिबीनी टुंडी साऊथ आफ्रिकेच्या त्सोलोची रहिवाशी आहे. लिंगभेद तसेच लिंग आधारित हिंसाचाराविरूद्ध लढ्यात ती बरीच सक्रिय असते. नैसर्गिक सौंदर्याचा पुरस्कार करणारी ती महिलांना स्वतःला आहे तसे स्वीकारण्यासाठी पाठींबा देते.

First Published on: December 9, 2019 11:14 AM
Exit mobile version