मुंबई पोलिसांनंतर CBI तपासावरही सुशांतचं कुटुंब नाराज; वकील विकास सिंह यांचा दावा

मुंबई पोलिसांनंतर CBI तपासावरही सुशांतचं कुटुंब नाराज; वकील विकास सिंह यांचा दावा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येस बरेच दिवस झाले असले तरी त्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरूच आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून केला जात असून सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांपाठोपाठ सीबीआयच्या तपासावरही नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास आता भलत्याच दिशेला जात असून हा तपास भरकटला असल्याने सुशांतचे कुटुंबीय या तपासावर नाराज असल्याचा दावा सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी केला आहे.

सीबीआयच्या तपासावर नाराज

“ज्या प्रकारे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरून सुशांतच्या कुटुंबीयांना असे वाटतेय की यातून सत्य बाहेर येणार नाही. एनसीबीनेही मुंबई पोलिसांसारखच सुरू केले आहे. एका एका कलाकाराला बोलवले जात आहे. हा सगळा तपास मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणेच सुरू आहे. यात सुशांतचे प्रकरण पाठीमागे पडले आहे,” , असे सुशांतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी म्हटले असून सुशांतचे कुटुंबीय सीबीआयच्या तपासावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सगळे लक्ष ड्रग्ज प्रकरणावर केंद्रित

तर विकास सिंह असेही म्हणाले की, “सुशांतच्या कुटुंबीयांना वाटत की, या प्रकरणाचा तपास वेगळा दिशेने व्हायला हवा होता. यात सगळे लक्ष ड्रग्ज प्रकरणावर केंद्रित केले जात आहे. एम्सच्या डॉक्टरांनी मला सांगितले की, सुशांतचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू नसून या तपासावर मी नाराज आहे. हे प्रकरण कोणत्या दिशेने जात आहे हे माहिती नाही. या प्रकरणात आतापर्यंत काय आढळून आले, यासंदर्भात सीबीआयने एकदाही माहिती दिलेली नाही,”

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात १४ जून रोजी गळफास घेतला होता. सुरूवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांच्या मागणीवरून सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आला असून सध्या सीबीआय प्रकरणाचा तपास करत आहे.


रकुल सिंगची चार, करिश्मा प्रकाशची सहा तास चौकशी

First Published on: September 26, 2020 10:38 AM
Exit mobile version