सुशांत आत्महत्या प्रकरण: संजय लिला भन्साळी यांची ३ तास कसून चौकशी!

सुशांत आत्महत्या प्रकरण: संजय लिला भन्साळी यांची ३ तास कसून चौकशी!

संजय लीला भन्साळी, सुशांत सिंह राजपुत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी बॉलीवूडचे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांची सोमवारी सुमारे तीन तास वांद्रे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, या चौकशीचा तपशील समजू शकला नाही, मात्र सुशांतसोबत चित्रपट करण्यावरुन कोणताही वाद नव्हता, तो दुसर्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी व्यस्त असल्याने त्याच्यासोबत काम करता आले नाही असे संजय लिला भन्सालींनी आपल्या जबानीत सांगितल्याचे कळते.

१४ जूनला सुशांतने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती, त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नव्हती. त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. सुशांत हा डिप्रेशनमध्ये होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात होते, मात्र या आत्महत्येमागे इतर काही कारण आहे का याचा सध्या वांद्रे पोलिसांकडून तपास सुरु आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत ३० हून अधिक लोकांची पोलिसांनी चौकशी केली आहे. या चौकशीतून सुशांत हा संजय लिला भन्साळींच्या रामलिला, पद्मावत आणि बाजीराव-मस्तानी या चित्रपटात काम करणार होता, मात्र ऐन वेळेस त्याला या चित्रपटातून काढून त्याच्या जागी रणवीर सिंह याला घेण्यात आले होते. सुशांतला या तिन्ही चित्रपटातून का काढण्यात आले? त्याला काढण्यासाठी संजय लिला भन्साळींवर कोणीही दबाव आणला होता का? त्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता का? याची वांद्रे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

गेल्या आठवड्यात संजय लिला भन्साळी हे चौकशीसाठी हजर राहणार होते, मात्र नंतर त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगण्यात आले, ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता ते चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांची तीन तास पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली होती. दुपारी साडेतीन वाजता त्यांना सोडून देण्यात आले. या चौकशीनंतर संजय लिला भन्साळींनी पत्रकारांशी बोलणे टाळले. त्यानंतर ते पोलीस ठाण्यातून निघून गेले. दुसरीकडे पोलिसांनी या चौकशीबाबात काहीही बोलणे टाळले.


हे ही वाचा – ‘सुशांतचा आत्मा ओरडतोय सीबीआय चौकशी करा’ सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल!


First Published on: July 6, 2020 9:11 PM
Exit mobile version