पालक आणि मुलांमधील ‘अंतरा’ची गोष्ट एक सांगायचंय

पालक आणि मुलांमधील ‘अंतरा’ची गोष्ट  एक सांगायचंय

कबीर रावराणे (अभिजीत आमकर), ध्रुव (शाल्व किंजवडेकर), अंगज (विभव राजाध्यक्ष) आणि अनाहितान (हर्षिता सोहल) हे एकदम खास दोस्त. मित्राच्या सुख दुःखात कायम हे चौघं एकत्र असतात. या चौघांची आपली एक गोष्ट आहे. त्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असली, तरी साधारण एकाच दुःखाचा सामना हे चौघही करत असतात. ते म्हणजे आपले आईवडील आणि त्यांच्या अपेक्षा. कोणाचे पालक अतिशिस्तीत आपल्या मुलाला वाढवतात. तर कोणाचे पालक आपल्या व्यावसायासाठी मुलांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपल्या मुलाला नेमकं काय हवंय, यावरून मुलं आणि पालक यांच्यात संवाद होत नाही. यातून जे घडतं ते म्हणजे ‘एक सांगायचंय’.

चित्रपटात या चौघांच्या वेगवेगळ्या बाजू दाखवल्या असल्या तरी कबीर रावराणेची बाजू प्रामुख्याने आपल्यासमोर येते. कबीरचे वडील मल्हार रावराणे (के.के.मेनन) हे पोलीस आयुक्त आहेत. आपल्या मुलानेही पोलीस व्हावं असं त्यांचं स्वप्न असतं. मात्र या सगळ्यात आपल्या मुलाला नक्की काय व्हायचंय याचा विचार कधीच ते करत नाही. मात्र नंतर जे घडायचं ते घडतंच. या घटनेनंतर त्यांचे डोळे उघडतात आणि आपल्याप्रमाणे इतर पालकांनी ही चूक करू नये यासाठी ते प्रयत्न करण्याचा निर्णय घेतात.

चित्रपटाचा विषय जुनाच असला तरी फार काही वेगळं या चित्रपटात घडत नाही. चित्रपटाच्या पहिल्या प्रसंगापासूनच एक नाराजीचा सूर लागलेला दिसतो. चित्रपटाचा पहिला भाग हा त्यामनाने पटापट पुढे सरकतो. पण दुसरा भाग हा तितकाच कंटाळवाणा होतो. सतत येणारे संवाद नंतर नकोसे होतात. चित्रपटातील अनेक फ्रेम या चित्रपटात का आहेत? याचा शेवटपर्यंत उलगडा होत नाही. त्याचबरोबर या चौघा मित्रांच्या कथा या चित्रपटाच्या अगदी शेवटच्या भागात प्रेक्षकांसमोर येतात. चित्रपटातील गाणी जितेंद्र जोशी यांची आहेत. मात्र फार गाणी लक्षात रहात नाहीत.

त्याचप्रमाणे चित्रपट बघताना अनेक अमराठी पात्र बघून इथे मराठी कलाकारांना संधी मिळायला हवी होती, असा सारखा विचार येतो. फक्त के.के. मेनन यांनी साकारलेला मल्हार रावराणे जमून आला आहे. तशी सगळ्यांचीच कामं उत्तम झाली आहेत. फक्त जुन्या कथेला नवीन साज चढला असता तर चित्रपट बघताना त्यात प्रेक्षक गुंतून गेला असता. मात्र हा विषय याआधी जरी चित्रपटात आला असला तरी तो आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षक नक्कीच या परिस्थितीचा विचार करतील.

First Published on: November 16, 2018 2:31 AM
Exit mobile version