रंगभूमीने ‘चेहरा’ नसलेल्यांना चेहरा दिला – सिद्धार्थ जाधव

रंगभूमीने ‘चेहरा’ नसलेल्यांना चेहरा दिला – सिद्धार्थ जाधव

९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सादर झालेल्या एकांकिका मधील कलाकारांचा गौरव प्रथितयश कलाकारांच्यावतीने करण्यात आला. यावेळी या कलाकारांनी आजची रंगभूमी आणि त्यात होणाऱ्या बदलावर भाष्य केले. सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव म्हणाला की, आम्हाला प्रत्येक ठिकाणी आवर्जून विचारलं जातं की या नाट्यभूमीने, रंगभूमीवर तुम्ही इतकं प्रेम करता, त्याला जपता पण रंगभूमीने तुम्हाला काय दिलं? त्यावर मी अभिमानाने सांगतो की मालिका, सिनेमा यांनी आम्हाला ओळख दिली, पैसा, फेम सगळं दिलं, पण माझ्यासारख्या अनेक कलाकारांना ज्यांना चेहरा नाही, नाकी डोळी देखणे नाही म्हणून अनेकदा बाजूला सारलं गेलं. ‘ये क्या करेगा’ असं म्हणत ऑडिशन मधून माघारी घलवून देण्यात आलं, अशा ‘चेहरा’ नसलेल्या कलाकारांना रंगभूमीने चेहरा दिला.

हे वाचा – नाट्यसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘राडा’ आणि ‘गटार’ गाजले

आजच्या सादर झालेल्या एकांकितेली कलाकारांचा गौरव करण्यासाठी सिद्धर्थ जाधव, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, अनिता दाते, समीर चौघुले, संतोष जुवेकर आदी कलाकार उपस्थित होते. सुशांत शेलार, समीर चौघुले आणि जीतूने “नाटकाला पाठिंबा द्या, नाटकावर प्रेम करा आणि खिशातले पैसे खर्च करून नाटक पाहायला या”, असं आवाहन रसिकांना केलं. रंगभूमीवरचं आपलं प्रेम व्यक्त करताना हे कलाकार थकले नाहीत.

इतकंच नाही तर सुशांत शेलरने ‘तो माझा बाप होता’ ही कविता सादर केली. उत्तम नाटकासोबत उत्तम कवी असलेल्या जितेंद्र जोशीनेही आपल्या खुमासदार शैलीत एक कविता रंगमंचावरून सादर केली. या दोघांनीही प्रेक्षकांची वाहवा आणि टाळ्या मिळवल्या. आम्ही खरे कलाकार आणि नाट्यकर्मी असल्यामुळे स्टेज वरून नुसतेच परतू शकत नाही, असं म्हणत या दोघांनी कवितांचे सादरीकरण केले. याशिवाय ‘आम्ही लवकरच या नाट्यगृहात आमचं नाटक घेऊन येऊ’ असं वचनही जाता जाता त्यांनी विदर्भ वासियांना दिलं. यावेळी उपस्थितांना आणि स्टेजवरील कलाकार मंडळींना या स्टार्ससोबत फोटो काढायचा मोह आवरला नाही.

First Published on: February 23, 2019 7:40 PM
Exit mobile version