‘रावरंभा’ एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार

‘रावरंभा’ एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार

आपला इतिहास हा आपला अभिमान असतो. याशिवाय इतिहासातील अनेक शूरवीरांचे व्यक्तीमत्त्व हे तरुणांसाठी नेहमीच एक आदर्श असते. इतिहासातील अनेक शूरवीरांची महती अनेक चित्रपटातून आणि पुस्तकातून जगभर पसरत असते. अनेकदा आपल्याला मोजक्याच इतिहासकारांची गाथा माहित असते त्यामुळे आपण इतर इतिहासकारांच्या कहाण्यांपासून अलिप्त राहतो. येत्या काळात अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातून शिवकालातील अनेक कथानके रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीत इतिहासावर आधारित आगामी चित्रपट येत आहे. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट त्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या राजधानी सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे.

शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे श्री शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांंनी ‘रावरंभा’ – द ग्रेट वॉरियर ऑफ १६७४. या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘बेभान’, ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’, ‘करंट’ असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच आता सुरु होणार असून चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच ‘रावरंभा’ या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला मावळा या पोस्टरवर दिसत असून अतिशय लक्षवेधी असे हे पोस्टर आहे. त्यामुळे आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.


हेही वाचा – घरोघरी कोरोना लसीकरण: केंद्राच्या परवानगीसाठी BMC राज्य सरकारच्या दरबारी

First Published on: March 30, 2021 3:35 PM
Exit mobile version