Sushant Singh Rajput प्रकरणाची चर्चा दिवसेंदिवस बालिश होत चाललीये

Sushant Singh Rajput प्रकरणाची चर्चा दिवसेंदिवस बालिश होत चाललीये

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन सध्या जो काही गजहब सुरु आहे, त्यावर हिंदी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी भाष्य केले आहे. या प्रकरणाची सध्या जी चर्चा सुरु आहे, ती अनावश्यक आणि बालिश असल्याची टीका त्यांनी केली. तसेच सुशांत जिथे आहे, तिथे त्याला शांतते (Rest in Peace) राहू द्या, असेही ते म्हणाले.

आपला आगामी चित्रपट Companion च्या बाबत अनुपम चोप्रा यांच्याशी बातचीत करत असताना नसीरुद्दीन यांना सुशांत प्रकरणाबाबत त्यांचे मत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत या प्रकरणावर भाष्य केले. “या प्रकरणाची चर्चा आता बालिश होत चालली असून माझ्यामते त्याची आवश्यकता नाही. आपण आपले घाणेरडे अंतर्वस्त्र उघड्यावर का धुत आहोत? काही अभिनेते त्यांना चित्रपटाच्या पोस्टरवर जागा मिळाली नाही? अशी तक्रार करतायत. काही जण मला अमुकतुमक चित्रपट मिळाला नाही, असं बोलत आहे. पण इथे अनेक कलाकार आहेत, ज्यांना एखाद दुसरा चित्रपट मिळालेला नाही. याचा अर्थ जर प्रत्येकजण त्याच्या तक्रारीचा पाढा वाचत राहिला तर ही सिनेसृष्टी पृथ्वीवरील सर्वात घाणेरडी जागा बनेल.”

नसीरुद्दीन शाह यांचे हे वक्तव्य अभिनेता दीपक डोब्रीयल यांनी उपस्थित केलेल्या एकाप्रश्नावर होते. दीपक डोब्रीयल यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या चित्रपटाचे पोस्टर अपलोड करुन त्यामध्ये त्यांना स्थान न मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले. नसीरुद्दीन शाह म्हणाले की, “त्या चित्रपटात मी देखील आहे. पण मी अजूनही कार्यरत आहे, यातच मी खूश आहे.”

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये अनेक गटतट पडले आहेत. काहींनी त्याला आतले आणि बाहेरचे असा रंग दिला आहे. कंगना रनौतने याची सुरुवात करुन बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांवर टीका केली. त्यानंतर स्टार किड्सला लक्ष्य केले.

First Published on: August 2, 2020 11:14 AM
Exit mobile version