अभिनय क्षेत्रात चिकाटी महत्वाची

अभिनय क्षेत्रात चिकाटी महत्वाची

माय महानगरच्या न्यूजरुममध्ये अभिनेता अनिकेत विश्वासराव (फोटो- संकेत शिंदे)

डहाणूकर महाविद्यालयात शिकत असताना अभिनय हे करिअर म्हणून निवडेन असं कधीच वाटलं नव्हतं. कारण नाटक आणि सिनेमाचा मला ’फोबिया’ होता. नाटक पाहताना त्यात काम करणार्‍यांचं फार कौतुक वाटायचं. त्यामुळे मी हे करु शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण एक आवड म्हणून अभिनयाला सुरुवात केली. अभिनयाची सुरुवात मॉबमध्ये काम करुनच केली. कारण त्यावेळी प्रत्येकाला लीड रोड मिळणेदेखील शक्य नव्हतं. पण तरीही मी चिकाटी ठेवली. मी लहान लहान रोल करत इंटरकॉलेजिएट नाटक करत राहिलो. इंटरकॉलेजिएट आयएनटी स्पर्धेत कठीण कठीण कठीण किती… या नाटकात अगदी दोन मिनिटांचा माझा रोल होता. पण तो अनेकांना त्यावेळी आवडला. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हे पारितोषिकही मिळालं. या एकांकिकेला त्यावेळी ७ पारितोषिके मिळाली. त्यामुळे तो आनंद वेगळाच होता. कॉलेजला स्वत: अभिनय करताना आणि दुसर्‍यांचा अभिनय पाहून प्रत्येकवेळी नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि अभिनयाचा प्रवास डहाणू कॉलेजपासून सुरु झाला.

नाटकाने घडवले

कॉलेज पूर्ण झाल्यावर ‘मला नकळत सारे घडले’ या नाटकासाठी विचारण्यात आले. त्यावेळी मला काहीच अनुभव नव्हता. या आधी या नाटकात  जितेंद्र जोशी काम करत होता. त्याचं काम मी पाहिलं होतं. शिवाय यात विक्रम गोखले, स्वाती चिटणीस अशी दिग्गज मंडळी होती आणि मी अगदीच त्यात नवखा होतो. त्यांचा सगळा सेटअप झाला होता. मी अगदी मध्येच जाणार होतो. खूप घाबरलो होतो.  पण ते मी चॅलेंज म्हणून स्वीकारलं. आणि त्यात काम केलं. त्यानंतर ‘सूर्याची पिल्ले’, ‘लव्हबर्डस’ ही नाटकं केली. पण तरीही नाटकाचा फोबिया एक भीती मात्र मनात अजूनही कायम आहे. पण नाटक करायला नक्कीच आवडेल.

स्वत:चा अभ्यास महत्वाचा 

कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी स्वत:चा अभ्यास महत्वाचा असतो. अभिनय क्षेत्रात मी जम बसवू शकलो नसतो तर मी दुसरं काहीतरी नक्कीच केले असते. वर वर पाहता अनेकांना अभिनय करणं सोप्प वाटलं असलं तरी त्यातील अनेक बारकाव्यांचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि चिकाटी महत्वाची असतं. अभिनयाला कॉलेजमधून सुरुवात केली असली तरी ते मला कितपत जमेल हे तेव्हा माहीत नव्हतं. पण मनाशी ठरवलं होतं की, या क्षेत्रात आपण तग धरु शकलो नाही तर अभ्यास सुरू ठेवायचा. कॉमर्सचा विद्यार्थी असल्यामुळे MBA साठी कॅटची तयारी केली होती. आज अभिनय क्षेत्रात नसतो तर मी माझ्या अभ्यासावर  लक्ष केंद्रित केलं असतं. पण सुदैवाने मी अभिनयासाठी लागणारी मेहनत करु शकलो. आणि मेहनतीचे फळ मिळतं होते. मला काम मिळत होतं.  याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले.  प्रत्येक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी स्वत:चा अभ्यास असणे गरजेचे असते. त्या अभ्यासाचा मला फायदा झाला.

‘फक्त लढ म्हणा’ने दिली वेगळी ओळख

फक्त लढ म्हणा सिनेमाचे पोस्टर
‘कळत नकळत’ माझी शेवटची मालिका. मालिका म्हटल्यावर महिन्यातील 20 ते 25 शूट असायचं. मला सिनेमात काम करायचं होतं. पण मी मालिकांमध्ये व्यग्र होतो. मला मालिकांच्या ऑफर्स येत होत्या. पण सिनेमा हे पूर्ण वेगळं विश्व होतं. काही महिने वाट पाहिल्यानंतर मला शेवटी ‘फक्त लढ म्हणा’ ची ऑफर आली. आणि त्यानंतर माझा खर्‍या अर्थाने मराठी सिनेमांमधील प्रवास सुरु झाला. या सिनेमाला भरभरुन प्रेम मिळालं यासाठी मी प्रेक्षकांचा ऋणी आहे.

तिन्ही माध्यम आवडीची

नाटकापासून माझ्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. पण कालांतराने मला मालिका आणि सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ही तिन्ही माध्यम माझ्या जवळची आहे. प्रत्येकासाठी लागणारी मेहनत ही वेगळी आहे.  मालिकांसाठी कमिटमेंट गरजेची असते. सिनेमा करत असल्यामुळे मालिकांमध्ये काम करणे सध्या शक्य होत नाही. पण पुढील काळात मालिकांमध्ये काम करायला नक्कीच आवडेल.

रिअ‍ॅलिटी शो नको रे बाबा

रिअ‍ॅलिटी शो करण्यासाठी एक वेगळंच धाडसं लागतं. मी मुळात मितभाषी आहे. फार कमी बोलतो. मला माझ्या माणसात रमायला आवडतं. तरीही मी  ‘एका पेक्षा एक’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये होतो.. पण बिग बॉससारखा रिअ‍ॅलिटी शो माझ्यासाठी नाही. कारण मी त्यात रमू शकत नाही. त्या शोमध्ये टिकण्यासाठीचं धाडसं माझ्यात नाही. त्यामुळे असे रिअ‍ॅलिटी शो नकोच

असा आहे ‘माझ्या बायकोचा प्रियकर’

हॉरर कॉमेडीमध्ये मोडणारा माझा  ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा सिनेमा येत्या २३ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. प्रियदर्शन जाधव या सिनेमात आहे. यात तो एका भूताचं काम करत आहे. त्याच्या विनोदाची खुमासदार फोडणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.  प्रियदर्शन माझा आवडता कॉमेडिअन आहे. त्याचा अगदी साध्यातील साधा जोकसुद्धा त्याच्या टाईमिंगमुळे आपल्याला खळखळून हसवतो.  सिनेमात  मी आणि भाग्यश्री मोटे नवरा- बायको असून फँटसीतून घडणारी हॉरर कॉमेडी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
अनिकेतची विस्तृत मुलाखत पाहा

अधिक माहितीसाठी-चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव सोबत दिलखुलास गप्पा

चमेलीतील ती भूमिकाही लक्षात

कलाकाराला भाषेचं बंधन नसतं आणि ते नसावं. हिंदी सिनेमात काम करायला मिळाल्याचा आनंद होता. शिवाय तेथे मिळणारे मानधनही मोठे होते.  करीना कपूरसोबत चमेली चित्रपटात छोटीशी भूमिका करायला मिळाली. तेव्हा ते शूट राजकमल स्टुडिओमध्ये सुरू होतं. मी सतत तीन दिवस दहिसर ते राजकमल स्टुडिओ असा प्रवास करत होतो. तिसर्‍या दिवशी माझा सीन होता आणि तो चांगला झाला. पण हिंदीत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.

अशोक मामांशी वेगळं नातं

माझा पहिला मराठी सिनेमा मी अशोक सराफ यांच्यासोबत केला होता. त्या सिनेमात त्यांचे आणि माझे फार कमी सीन होते. पण सेटवर मी त्यांचा अभिनय निरखून पाहायचो. त्यांच्यातील विनोदाची टायमिंग इतकी परफेक्ट आहे की ती शिकण्यासारखी आहे. त्यांच्यासोबत आतापर्यंत मी तीन सिनेमे केले आहेत. नुसताच विनोद नाही तर त्यांच्या अभिनयातील बारकावे शिकण्यासारखे आहे. शिवाय प्रत्येक नव्या सिनेमात काम करताना मी हे पहिल्यांदाच काम करतो अशा पद्धतीने ते सिनेमाचा अभ्यास करतात. ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहेच. पण ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत. ते फार कमी बोलतात पण ते आवर्जून त्यांचे अनुभव सांगतात.  सेटवर ते असल्यावर एक वेगळचं वातावरण असते. ते आल्यावर दडपण येतं. पण ते   वातावरण हलकं करण्याचे काम करतात.

अभिनय करायचाय? 

अभिनय ही मुळात एक कला आहे. जर अभिनय करायचा असेल तर त्यासाठी लागणारी मेहनत करण्याची तयारी हवी. एखाद्या अभिनेत्याला,अभिनेत्रीला पाहून या क्षेत्रात येण्याचा विचार करणे चुकीचे. त्यापेक्षा अभिनय ही कला आपल्यात आहे का ? हा देखील विचार करायला हवा.

पॅडेड की पुशअप? 

सध्या वेबसीरिजचा बोलबाला आहे. तेजश्री प्रधान आणि माझी ही नवी कोरी वेब सीरिज एक वेगळा विषय घेऊन येणार आहे. नावावरुनच तुम्हाला ती किती वेगळी ते कळली असेल.  यात किशोरी अंबीये, सक्षम कुलकर्णी देखील आहेत.  मुळात तेजश्री आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. एक वेगळा विषय आहे.  लवकरचं ही  वेब सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

महानगराने घडवले

मी मुळचा मुंबईचा. माझं सगळं शिक्षण करिअर मुंबईतलच. त्यामुळे  मी जे काही घडलो तो मुंबईतच. मुंबईनेच मला घडवले. मुंबईचे ऋण फेडण्या इतका मी मोठा नाही. पण  मला या महानगरासाठीच नाही तर देशपातळीवर माझ्यापरीने होणारी मदत करायला आवडेल.
First Published on: November 4, 2018 4:28 PM
Exit mobile version