कुत्ते…शहरातल्या जंगलात माणसातल्या श्वानांची गोष्ट

कुत्ते…शहरातल्या जंगलात माणसातल्या श्वानांची गोष्ट

ज्येष्ठ कवी, गझलकार सुरेश भट यांची ‘कुत्रे’ नावाची कविता त्यांच्या ‘एल्गार’ मध्ये आहे. यात माणसातल्या श्वानगुणांचं परिणामकारक वर्णन आहे. माणसात जनावरं असतात आणि शहरांची भेसूर जंगलं असतात… माणसातली गाढवं हेटाळणीचा विषय ठरतात, लांडगे कोल्हे धूर्तपणा, संधीसाधूत्वासाठी ओळखली जातात, माणसातल्या ‘वाघां’चा माणसांच्या समाज नावाच्या झुंडींना अभिमान असतो. तर सगळ्यात नाकारलेल्या प्राण्यात माणसातली ‘कुत्री’ असतात. कुत्र्यांच्या इमानाचं कौतूक करणारी माणसं माणसातल्या या श्वानपणाच्या इमानदारीचं मात्र कौतूक करत नाहीत, माणसातल्या श्वानाला रोटी, नोटांची बिस्कीटं टाकल्यावर तो मालक नावाच्या माणसाचे पाय चाटायला सुरुवात करतो आणि संधी साधून मालक नावाच्या जनावराचे लचके तोडतो, माणसाला सोयीनुसार स्वतःमध्ये पाळलं जाणारं जनावर निवडण्याची संधी असते, खर्‍याखुर्‍या प्राण्यांना ही सवलत नसते. त्यामुळे माणूस नावाचा द्विपाद प्राणी जगातल्या कुठल्याही प्राण्यापेक्षा जास्त विषारी आणि धोकादायक असू शकतो. आस्मान भारद्वाजच्या ‘कुत्ते’ चा पडदा अशा परस्परांना दिल्या जाणार्‍या ‘इमानी’ धोक्यांनी दोन तास व्यापलेला असतो.

‘कुत्ते’ पाहाण्यासाठी पहिल्यांदा दिग्दर्शक भारद्वाजच्या नावापुढे विशाल नाही, हे मनाला पटवून देऊनच सिनेमागृहात जावं, नाहीतर भ्रमनिरस वाट्याला येऊ शकतो. कुत्तेचा दिग्दर्शक विशाल भारद्वाज नसतो, त्यांचे चिरंजीव ‘आस्मान’ यांनी ‘कुत्ते’ दिग्दर्शित केलेला असतो. त्यामुळे विशालचा ओमकारा, हैदर, मकबूल पाहून ‘कुत्ते’ कडून अपेक्षा ठेवणं धोक्याचं असतं. आस्मान भारद्वाज या चिरंजीवांचं दिग्दर्शनातलं हे पहिलंच पाऊल असल्यानं त्यानं पडद्यावर ‘कुत्ते’ ची खेळलेली मॅच पिता विशाल भारद्वाजनं संवाद, पटकथेतून बर्‍यापैकी वाचवली आहे.

विशालच्या याआधीच्या सिनेमांमध्ये माणसांमधली जनावराचं पडद्यावर उतरतात. ‘शिकार करावी किंवा शिकार व्हावी’ असा हा साधासरळ नियम असतो. ‘कुत्ते’मध्ये माणसांच्या शहर नावाच्या जंगलात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी असतात. गुंडांच्या संघटीत गुन्हेगारी टोळ्या, पोलीस खात्यातल्या झुंडी, राजकारणातल्या कुत्र्यांचे ‘श्वान मालक’ ही असतात. या कुत्र्यांच्या झुंडीतून बाहेर पडून वाघ बनण्याची स्वप्ने या श्वानांची असतात. या कुत्र्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करून घेण्यासाठी पैसा नावाची खूप सारी हाडकं लागतात. याच हाडकांचं आमिष दाखवून कुत्र्यांचे इमान विकले विकत घेतले जाते.

कथेची सुरुवात २००३ च्या वर्षातून झाल्यानंतर थेट कथा दहा वर्षे पुढे सरकते, कोंकणा सेन ही गडचिरोलीत नक्षलवादी हिंसक चळवळीची म्होरकी आहे. तर पोलीस अधिकारी अर्जुन कपूर हा करप्शनच्या चिखलात सुखनैव लोळणारा पोलीस व्यवस्थेतल्या अधिकारपदावरचा श्वान आहे. त्याच्या झुंडीत‘पाजी’ (कुमूद मिश्रा) या हवालदाराची त्याला साथ आहे. पोलीस खात्यातल्या अंमलीपदार्थांच्या व्यवहारातून त्यांना कोट्यवधींच्या नोटांची ‘हाडक’ं हाती लागतात. छोट्या अधिकार्‍यांनी पळवलेल्या या हाडकांसाठी पोलीस खात्यातल्या अधिकारपदावरच्या मोठ्या श्वानांमध्ये खेचाखेची होते, मोठ्या पोलीस अधिकारपदावरील श्वानाचं प्रतिनिधीत्व तब्बूनं (पम्मी) नं केलं आहे. हाडकांच्या या खेचाखेची, पळवापळवीने ‘कुत्ते’ चा पडदा व्यापून जातो. या कोट्यवधींच्या हाडकांचा मूळ मालक ड्रग माफिया नसिरुद्दीन शहा (नारायण खोबरे) आहे. तर नारायणची मुलगी लवली (राधिका मदान) आणि नारायणाने पाळलेला ‘द्विपाद श्वान’ दानिश (शार्दुल भारद्वाज) यांना या मालकाच्या या श्वान झुंडीपासून मुक्त होऊन निखळ माणूस बनण्यासाठी रक्कम रुपातल्या काही हाडकांची गरज आहे. त्यातून झालेल्या ‘शिकार होणं आणि शिकार करण्या’चा रक्तरंजित खेळ म्हणजे ‘कुत्ते’चं कथानक …

चित्रपटाची संकल्पना ‘भयंकर वेगळी’ असली तरी सादरीकरणात कुत्ते कमी पडला आहे. पिता विशाल भारद्वाजने अनेक ठिकाणी चिरंजीव आस्मानला संवादातून सावरलेलं आहे. चित्रपटात इंटिमेंट सीनचा अनावश्यक मारा उगाच आहे. पडद्यावर व्यक्तीरेखांच्या तोंडी दिल्या जाणार्‍या ‘शिव्यां’मध्ये उस्फूर्तता, सहजता नसल्याने त्या कमालीच्या कृत्रिम आणि बाळबोध झाल्या आहेत. त्यासाठी आस्मानने वडील विशाल भारद्वाजांनी संगीत दिलेला रामूचा ‘सत्या’ किंवा विधु विनोद चोप्राचा ‘परिंदा’ दहा वेळेस पहायला हरकत नाही, शिव्या नसतानाही गुन्हेगारीपट परिणामकारक वास्तववादी करता येतो, हे समजता येईल. गडचिरोलीच्या जंगलातले नक्षलवादी लोणावळ्याच्या जंगलात थेट रायफल घेऊन झुंडीने कसे घुसतात, हे समजायला कुत्ते मध्ये मार्ग नसतो, गोळ्यांचा पाऊस म्हणजेच प्रसंगपरिणाम, अशा अनेक अतार्किक गोष्टी कुत्ते मध्ये पडद्यावर येतात, मात्र असे ढोबळ तर्क, कथानक, प्रसंगातली संगती विसरायला लावणारा वेग आणि खिळवण्याची क्षमता ‘कुत्ते’ त नसल्यानं दोन तासांचा सिनेमा आणखी पुढे रेटला नसल्याचं समाधान मिळतं. कुत्तेमध्ये गाणी नाहीत, तशी कथेची गरजही नाही. पार्श्वसंगीत कॅमे-याचे कोन प्रमाणात फिरतात, बंदुकीच्या गोळ्यांसोबतच येणारा थेंबांच्या पावसामुळे प्रसंग गडद होतात.

केवळ माणसात दडलेल्या श्वानाचे ‘तळवे चाटणं’, ‘केकाटणं’, भूंकणं, मागे लागणं, शेपूट हलवणं, शेपूट खाली घालणं, असे सगळे गुणविशेष कुत्तेच्या पडद्यावर आढळतात, तरीही ‘आस्मान भारद्वाजने पहिल्यांदाच दिग्दर्शनातून उभं केलेलं हे पडद्यावरच्या शहरातल्या श्वानांचं जंगल बरंच म्हणालया हवं, मात्र ते माणसाच्या मनापेक्षा अंधारलेलं, मिट्ट काळोखात बेपत्ता झालेलं, भेसूर किंवा भीतीदायक झालेलं नाही.

-संजय सोनवणे

First Published on: January 13, 2023 9:00 PM
Exit mobile version