Eknath Shinde : ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्ट मत, म्हणाले…

Eknath Shinde : ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्ट मत, म्हणाले…

ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्ट मत

नाशिक : ठाणे लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामुळे ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे ठाण्यातील शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. भाजपा नेते आणि आमदार गणेश नाईक यांचे समर्थक माजी नगरसेवक तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत निषेध केल्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याचप्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. (Eknath Shinde clear opinion on displeasure of BJP officials in Thane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी (ता. 02 मे) महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसार माध्यमांना भाजपा नेते संजीव नाईक यांच्या नाराजीबाबत विचारले असता ते म्हणाले की, नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि आमच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संजीव नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे महायुतीचे काम सर्व मिळून करणार आहेत.

हेही वाचा… Ganesh Naik Vs Naresh Mhaske : नरेश म्हस्केंविरोधात नाईकांची पेटवली संघर्षाची वात

तसेच, महायुती ही इतर कोणासाठी नसून या देशाच्या विकासासाठी करण्यात आली आहे. ही निवडणूक एका मतदारसंघाची नसून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आहे. या देशाला महासत्ता बनविण्यासाठी आहे. निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो. परंतु, एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते काम करतात, असा आमचा अनुभव आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आता ठाणे लोकसभेमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू झालेला हा वाद कधी संपणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ठाण्यातील भाजपा पदाधिकारी नाराज का?

ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळावा यासाठी भाजपा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील होता. शिवाय भाजपाकडून माजी खासदार डॉ. संजीव नाईक दुसर्‍यांदा या मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी महापौर आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपा पदाधिकारी नाराज झाले आहेत.

नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसमध्ये सकाळपासूनच नाराजीचा सूर आळवत बैठकांचा सपाटा सुरू झाला. नरेश म्हस्के यांना नवी मुंबईतून सहकार्य न करण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली. एवढेच नव्हे तर डॉ. संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्याने भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, मंडल, बूथ संघटक आणि वॉरियर्सने पदांचे राजीनामे दिले आहेत. गणेश नाईकांनी शिवसेनेविरोधात संघर्षाची वात पेटवल्यामुळे एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : बोटावरची शाई दाखवून दूधावर घ्या इन्सेन्टिव्ह, अमूलची अभिनव स्कीम


Edited By : Poonam Khadtale

First Published on: May 2, 2024 4:14 PM
Exit mobile version