कोरोना रुग्ण वाढीवर हॉटस्पॉटची मात्रा?

कोरोना रुग्ण वाढीवर हॉटस्पॉटची मात्रा?

कोरोना प्रादुर्भाव वाढीच्या घटनेला एक वर्ष होत आहे. त्यातच कोरोना या आजारावरील लस तयार करण्यात आल्यानंतर ती देण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे आता कुठे ६० वर्षांवरील ज्येष्ठांना आणि व्याधीग्रस्त नागरिकांना लस देणे सुरू झाले असताना कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेने कार्यक्षेत्रात सापडणार्‍या रुग्ण संख्येनुसार त्या- त्या ठिकाणी हॉटस्पॉट म्हणून जाहीर करत नागरिकांना कायदेशीर कारवाईचा डोस पचण्याचा प्रयत्न केला. तर, या संदर्भात महापालिकेने काढलेल्या अध्यादेशावर मंगळवारी सकाळी शासनाकडून कान टोचल्यानंतर लॉकडाऊन नसल्याचे स्पष्ट करत अवघ्या काही तासात घुमजाव करण्यात महापालिका प्रशासनाने धन्यता मानली आहे. त्यातच महापालिकेने अकलेचे तारे तोडत ठाणेकर नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही जाहीर करून प्रसारमाध्यमांकडे बोट दाखवण्याचे काम मात्र चोख बजावले.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत ६३ हजार ८३० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ६० हजार ५७८ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत घरी परतले आहेत. तर १ हजार ४०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच, मागील २० दिवसात (२० फेब्रुवारीपासून ८ मार्च दरम्यान) ठाणे महापालिकेच्या हद्दीत ३ हजार २२८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच २ हजार ३१५ उपचार घेत घरी परतले असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दिवसात सरासरी १०० ते १५० च्या आसपास आहे. त्यातच मध्यंतरी रुग्णांची संख्या दोनशेवर ही गेली होती. त्यातच, वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे २८ फेब्रुवारीपर्यंत ज्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन होता. तो आता पुढील ३१ मार्च पर्यंत वाढविण्याचा निर्णय अध्यादेश काढून महापालिकेने घेतला आहे. यापूर्वी हॉटस्पॉटचे भाग हे कमी होते. परंतु मागील काही दिवसापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हॉटस्पॉटच्या भागांची संख्या देखील वाढल्याचे त्या अध्यादेशात दाखवण्यात आले. आजही शहरातील काही महत्वाच्या भागांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये माजिवडा – मानपाडा, लोकमान्य सावरकर नगर, वर्तकनगर, उथळसर, नौपाडा, कळवा आदी भागांचा समावेश करून माजिवडा मानपाडा तर रोजच्या रोज ४० ते ५० रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या भागांचा सर्व्हे करुन पुढील धोरण निश्चित केले जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार आता हा सर्व्हे झाला असून त्यामध्ये ७ प्रभाग समितीमधील तब्बल १६ हॉटस्पॉट पुढे आल्यावर त्या हॉटस्पॉटमध्ये येत्या ३१ मार्चपर्यंत अंशता लॉकडाऊन असणार आहे. परंतु हा अंशत: जरी सांगितले जात असले तरी तो कडक करण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे.

या हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहणार्‍या नागरीकांसाठी खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या १६ हॉटस्पॉटमधील सावधानता बाळगावी, असे आवाहन महापालिकेने करत नियमांचे पालन न करणार्‍यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे. या हॉटस्पॉट भागांमध्ये यापूर्वी जे निर्बंध लावण्यात आले होते. ते निर्बंध कायम असतील असेही महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात नमूद केले होते. परंतु तो अध्यादेश काढून रात्र ही सरत नाहीतोच सकाळीच शासनाकडून महापालिका प्रशासनाची कान उघडणी केली. कान टोचणीनंतर महापालिकेने युटर्न मारून ठाणे महापालिका क्षेत्रात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणार्‍या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले आहे. ते निर्बंध शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही, असेच प्रसिद्धपत्रक काढून स्पष्ट केले.

कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच ३१ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते त्यानुसार सुरू राहतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आला नाही. ज्या आस्थापना सुरु आहेत. त्या आस्थापना यापुढेही सुरु राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन करत अध्यादेश काढलाच नसल्याचा गवगवा करत महापालिका प्रशासनाने यातून अंग झटकले. त्याचबरोबर महापालिकेने हॉटस्पॉटच्या मात्राचा आपटी बार हा फुसका बार कसा असतो, ते दाखवून दिले आहे.

– पंकज रोडेकर – लेखक ठाणे प्रतिनिधी आहेत. 

हेही वाचा –

Corona Vaccination: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

First Published on: March 11, 2021 3:13 PM
Exit mobile version