दगडांच्या देशा…

दगडांच्या देशा…

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा

महाराष्ट्राचा महिमा गाणारे हे राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांचे काव्य आज महाराष्ट्राची एकूणच राजकीय परिस्थिती पाहिली की प्रकर्षाने आठवल्याशिवाय राहत नाही. सध्या महाराष्ट्रात राजकीय सत्तापिपासेने परिसीमा गाठलेली आहे. महाराष्ट्राच्या सर्वंकष प्रगतीपेक्षा पक्षीय राजकारण आणि पदे मिळवण्याच्या ईर्षेने राजकीय नेत्यांना असे काही पछाडले आहे की कवी, लेखक, विचारवंत यांनी जो महाराष्ट्राचा मोठेपणा आपल्या लेखनीतून शद्बबद्ध केला आहे, त्याचा सद्यस्थितीत त्यांना पार विसर पडलेला दिसतो. महाराष्ट्र हा खरेतर इतर राज्यांसाठी सगळ्याच बाबतीत आदर्श राहिलेला आहे. बहुतांश सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिवर्तनाच्या विचारांचे प्रणेते हे महाराष्ट्रातीलच आहेत. अनेक सुधारणावादी चळवळींचा उगम महाराष्ट्रात झाला आणि पुढे त्यांचे अनुकरण इतर राज्यांनी केले. या सगळ्या इतिहासाचा आपल्याला विसर पडलेला आहे याची जाणीव महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना राहिलेली नाही असेच एकूणच परिस्थितीचे अवलोकन केल्यावर नाईलाजाने म्हणावे लागते. आज विरोधी बाकावर बसण्याचा संयम कुणामध्येही दिसत नाही. प्रत्येकाला सत्ताधारी बाकांवर बसायचे आहे. त्यात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर स्वत:साठी मंत्रीपदे मिळवायची आहेत.

केंद्रात भाजपची बहुमतातील सत्ता येऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आता अल्पावधीत सगळ्या राज्यांमध्ये आपलीच सत्ता आली पाहिजे, असे भाजपच्या नेत्यांना वाटू लागले आहे. महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हातातोंडाशी आलेली सत्ता गेल्यानंतर केंद्र आणि राज्यातील भाजपचे नेते शिवसेनेच्या विरोधात असे काही सुडाने पेटून उठले की काहीही करून राज्यातील सत्ता मिळवायचीच असा चंग त्यांनी बांधला. त्यासाठी गेल्या अडीच वर्षांत त्यांनी काय काय केले ते लोकांना माहीत आहे. खरेतर भाजपच्या नेत्यांनी कुठल्याही उचापत्या न करता ते शांत राहिले असते तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आपोआप कोसळले असते, पण तितकी उसंत बाळगण्याची भाजपच्या नेत्यांची मानसिकताच नव्हती. काहीही करून महाविकास आघाडी सरकार पडायला हवे, असाच त्यांचा पवित्रा राहिला.

शेवटी अडीच वर्षांनंतर भाजपला शिवसेनेतील असंतुष्टांना बळ देण्यात यश आले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचा वेगळा गट भाजपच्या हाती लागला. सुरुवातीला आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, ती शिवसेनेतील अंतर्गत बाब आहे, असे भाजपकडून दाखविण्यात येत होते. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने चंद्रकांत पाटील आघाडीवर होते, पण पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे कुणाचा हात होता, त्यांना सूरत, गुवाहाटी असे पर्यटन घडवून झाडी, डोंगार, हाटील यांचे दर्शन घडवून त्यांची ओक्केमध्ये कुणी व्यवस्था केली हे सगळ्यांना दिसले.
महाविकास आघाडीतून राज्याचे मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात आपल्या संयमित स्वभावाने कुटुंबप्रमुखाप्रमाणे राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांना धीर दिला, पण ज्या प्रकारे त्यांनी तडकाफडकी वर्षा बंगला सोडला आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यावरून आपण कसलेले राजकीय नेते नाहीत हेच त्यांनी दाखवून दिले. बहुमताच्या चाचणीत आपल्याच पक्षातील लोकांकडून आपलाच पराभव होईल हे आपल्याला पाहवणार नाही, असे सांगून त्यांनी अगोदरच राजीनामा दिला.

भाजपने शिवसेनेतील बंडखोरांना आपलेसे करून राज्यात सत्ता स्थापन केली, पण आजही सत्ताप्राप्तीचा मामला न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला आहे. त्यामुुळे १ ऑगस्टला काय होणार, त्यानंतर ८ ऑगस्टला काय होणार याकडे सगळ्या राजकीय पक्षांचे डोळे लागलेले आहेत. त्यातही भाजपवाले तर त्या निर्णयाकडे डोळ्यात प्राण आणून पाहत आहेत. कारण भाजपने शिवसेनेतील बंडखोरांना आपल्यासोबत घेऊन सत्ता स्थापन केली असली तरी ते बंडखोर आजही आम्ही शिवसेनेत असल्याचे सांगत आहेत. त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केलेला नाही किंवा वेगळ्या पक्षात ते विलीन झालेले नाहीत. तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी की शिंदे गटाची शिवसेना खरी, यात उद्धव ठाकरे यांचे पारडे जड होण्याची शक्यता जास्त दिसते. कारण शिवसेनेची स्थापना, पक्षाची घटना, आजवरचा इतिहास पाहिल्यावर हा पक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुढचे वारसदार यांच्या अखत्यारित येतो. शिंदे यांनी एक वेगळा गट निर्माण करून आपणच बाळासाहेबांची शिवसेना आहोत, असा दावा तेे करत आहेत, पण बाळासाहेबांचा वारसदार असलेल्या उद्धव ठाकरे यांना बाजूला ठेवून हे मान्य करणे कितपत शक्य होईल, हा खरा प्रश्न आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन या ईर्षेने गेल्या अडीच वर्षांत सगळी शक्ती पणाला लावून भाजपला सत्तेत तर आणले आहे, पण पुढचा प्रवास अवघड आहे असेच सद्यस्थिती पाहिल्यावर दिसते. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत, त्यागाची तयारी ठेवा, असे आवाहन ते करत आहेत. स्वत: फडणवीस यांना मोठा त्याग करावा लागला आहे. तीच अपेक्षा आता ते भाजपच्या नेत्यांकडून करत आहेत. पनवेलमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी हे सांगून मंत्रिमंडळ विस्तार अजून का होत नाही हेदेखील सूचित केले. खरेतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे राज्यातील भाजप नेत्यांना आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांना वाटत होते, पण केंद्रातील नेत्यांनी काही वेगळेच घडवून आणले. सत्ता तर आली, पण भाजपच्या नेत्यांनाच मोठा त्याग करावा लागत आहे. अपेक्षित मंत्रीपदे मिळाली नाहीत आणि शिवसेनेच्या बंडखोरांनी नाराज होऊन वेगळा मार्ग निवडला तर सरकार पडेल आणि फडणवीसांची दुसर्‍यांदा नाचक्की होईल. अजित पवारांचे बंड फसल्यानंतर ती अगोदर झालेली आहे.

पाहुणे आले आणि डोईजड झाले, अशी अवस्था सध्या भाजपवाल्यांची झालेली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले, असे कार्यकारिणाच्या बैठकीत सांगून एकूणच भाजपवाल्यांच्या मनातील वेदना व्यक्त केली. दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर, हा त्यांचा प्रश्न आहे, असा टोला लगावायला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विसरले नाहीत. गोविंदाग्रज दगडांच्या देशा, असे महाराष्ट्राविषयी खंबीरपणासाठी बोलले होते, पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जनहितापेक्षा सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या मनाचे दगड झालेले दिसत आहेत.

First Published on: July 25, 2022 2:34 AM
Exit mobile version