स्त्री प्रश्नाच्या चर्चाविश्वाचा अक्षरवेध

स्त्री प्रश्नाच्या चर्चाविश्वाचा अक्षरवेध

–डॉ. प्रवीण घोडेस्वार

मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले ह्या आद्य शिक्षिका. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेलं कार्य, दिलेलं अतुलनीय योगदान आणि सहन केलेल्या कमालीच्या हालअपेष्टा याविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन तमाम स्त्रीवर्गाच्या उत्कर्षासाठी वेचलं. आपलं अख्खं आयुष्य त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी समर्पित केलं. त्यांचं हे अनमोल कार्य विस्मृतीत जायला नको म्हणून यावर सातत्याने बोलणं, सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून नव्या पिढीला त्यांच्या क्रांतिकारी कार्याची माहिती होईल. त्यांच्या कार्यात सावित्रीबाईंना महात्मा जोतीबा फुले यांची लाभलेली समर्थ नि भक्कम साथदेखील तेवढीच महत्त्वाची होती. फुले दाम्पत्याच्या अथक प्रयत्नांमुळेच आज स्त्रिया जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवून यशाची नवनवी शिखरे गाठताना दिसत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने वर्ष १९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दशक (१९७५ ते १९८५) जाहीर करण्यात आलं. यानंतरच्या काळात जगात तसेच भारतातही स्त्री प्रश्न ऐरणीवर आला. स्त्रियांच्या चळवळी उदयास येऊन गतिमान झाल्या. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय पटलावर स्त्रियांच्या प्रश्नांची दखल घेतली जाऊ लागली. सुरुवातीच्या काळात केवळ पांढरपेशी, उच्च जातीय-वर्णीय-वर्गीय स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी स्त्रीमुक्ती चळवळ कालांतराने व्यापक होऊ लागली. समाजातल्या बहुजन-दलित-आदिवासी-भटके विमुक्त समूह-शोषित-वंचित-अभावग्रस्त समूह- मुस्लीम स्त्रिया- ख्रिस्ती स्त्रिया-धर्मांतरीत स्त्रिया-परितक्त्या स्त्रिया यांचेदेखील काही प्रश्न आहेत जे की अभिजन वर्गातल्या स्त्रियांपेक्षा भिन्न आहेत, हे ठळकपणे अधोरेखित होऊन मान्य करण्यात आलं.

या समूहातल्या स्त्रियांचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक लहान-मोठ्या चळवळी उदयास आल्या. आंदोलनेदेखील करण्यात आली. शिक्षणाने आत्मभान आलेल्या या स्त्रिया मग पुढे येऊन आपलं म्हणणं मांडू लागल्या. त्या लिहायला लागल्या. साहित्याच्या माध्यमातून आपल्या जगण्याची, त्यातल्या वेदनांची अभिव्यक्ती करू लागल्या. मराठी साहित्यात प्रारंभी पांढरपेशा, सवर्ण समाजातल्या स्त्रियांनी केलेलं स्त्रीवादी म्हणता येईल असं लेखन प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. आधी उल्लेख केल्याप्रमाणे नंतरच्या काळात बहुजन समाजातल्या स्त्रियांनी साहित्याच्या प्रांतात शिरकाव करून त्यांच्या दैनंदिन जगण्याशी निगडित लेखन करायला सुरुवात केली. यामध्ये कथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्रात्मक लेखन अशा वैविध्यपूर्ण साहित्याचा समावेश आहे.

स्त्री प्रश्न आणि स्त्रियांचे सबलीकरण हे मुख्य उद्दिष्ट ठेवून अनेक बिगर सरकारी/स्वयंसेवी संस्था देशभरात आणि आपल्या राज्यातही स्थापन झाल्यात. या संस्थांमार्फत स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, अडचणी यांचं निराकरण कसं होईल यासाठी प्रयत्न सुरू झालेत. १९८० च्या दशकात हुंडाबळी ही मोठी समस्या होती. या समस्येविषयी समाजात जाणीव-जागृती करण्याचं, लोकांचं उद्बोधन करण्याचं काम अशा स्वयंसेवी संस्थांनी केलं. त्यांच्या कार्यामुळे समाजात अनेक सकारात्मक बदल घडून आलेत. स्त्रियांवर होणारे अत्याचार, होत असलेला अन्याय, त्यांची समाजात होणारी कुचंबणा, त्यांना देण्यात येत असलेलं दुय्यमत्व, त्यांची होणारी छेडछाड, प्राथमिक शिक्षणातली मुलींची गळती, स्त्रीभ्रूणहत्या अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यात या संस्थांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. सुरुवातीच्या काळात या संस्था केवळ महानगर आणि शहरी भागात काम करीत होत्या. हळूहळू त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला. या संस्था मग निमशहरी भागात पोहचल्या. नंतरच्या टप्प्यात ग्रामीण भागातही त्यांनी काम करायला सुरुवात केली. यामुळे ग्रामीण भागातल्या स्त्रियांना कोणकोणत्या समस्यांना, अडचणींना सामोरे जायला लागतं याची जाणीव नागरी समाजाला झाली.

कृषी आणि कृषीपूरक व्यवसायात स्त्रियांचे विशेषत: कष्टकरी बायकांचे होणारे शोषण, पुरुषांइतकंच काम करूनसुद्धा पुरुषांपेक्षा कमी मिळणारा मोबदला (मजुरी) यांसारख्या लिंगाधारित भेदभावाविषयी समाजात जागृती होऊ लागली. ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येणारी निरक्षरता, अंधश्रद्धा यांसारखे मुद्देही चर्चेत आले. यावर उपाय म्हणून अनेक गावांमध्ये प्रौढ साक्षरतेचे वर्ग सुरू करण्यात आले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तीव्रतेने भेडसावणारी समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात तर हा प्रश्न अतिशय बिकट असल्याचं निदर्शनास आलं. बायकांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट ही मोठी समस्या असल्याचं आढळून आलं. या अडचणीमुळे अनेक मुलींना शाळा सोडावी लागली अथवा त्यांच्या शाळेतल्या उपस्थितीवर परिणाम झाला. पिण्याच्या पाण्याशिवाय ग्रामीण भागातील अजून एक महत्त्वाची समस्या होती ती म्हणजे इंधनाची. रोजच्या जगण्यासाठी लागणारे सरपण महत्प्रयासाने उपलब्ध होत होते. पुढे स्वंयपाकाच्या गॅसची उपलब्धता वाढल्याने या समस्येची तीव्रता बर्‍याच प्रमाणात कमी झाली.

‘स्त्रीत्वाच्या गाथा’ या पाक्षिक सदरात आपण स्त्री प्रश्न, स्त्रीवाद, स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे सबलीकरण, लिंगभाव संवेदनशीलता, स्त्रियांशी निगडित कायदे, दलित-मुस्लीम-आदिवासी-बहुजन स्त्रियांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या विषयांची चर्चा करणार्‍या पुस्तकांचा परिचय करून घेणार आहोत. ज्या पुस्तकांचा समावेश यात केलेला आहे ती सर्व पुस्तके त्या त्या विषयातल्या जाणकारांनी, अभ्यासकांनी, पत्रकारांनी, कार्यकर्त्यांनी, तज्ज्ञांनी लिहिलेली आहेत. सर्वसामान्य वाचकांना पुस्तकातला आशय सहज समजेल अशाच पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये स्त्री प्रश्नाची सैद्धांतिक मांडणी करणार्‍या अकॅडेमीक पुस्तकांचा अंतर्भाव केलेला नाही. तसेच स्त्रीवादी मराठी साहित्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, ललितलेख संग्रह यांचाही समावेश केलेला नाही.

त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातल्या ‘कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय किंवा स्त्रियांच्या यशोगाथा’ या वर्गवारीत मोडणारी पुस्तकंदेखील यात समाविष्ट केलेली नाहीत. एक-दोन अपवाद वगळता या सदरासाठी निवडण्यात आलेली सर्व पुस्तकं वर्ष २००० किंवा त्यानंतर प्रकाशित झालेली आहेत. म्हणजे गेल्या दोन दशकांत निर्माण झालेला हा अक्षर दस्तऐवज आहे. ही पुस्तकं वाचकांना विचारप्रवण करणारी आणि अनुभवावर आधारित मांडणी असलेली आहेत. या सदरातला परिचय वाचून वाचकांना पुस्तक वाचण्याची इच्छा होऊन ते वाचन करतील अशी आशा आहे. त्याचप्रमाणे त्या त्या पुस्तकातून मांडण्यात आलेला स्त्री प्रश्न, त्याचे विविध कांगोरे, त्याची तीव्रता, त्याचे निराकरण करण्यासाठीची उपाययोजना याविषयी एक सम्यक आकलन आणि समग्र जाणीव वाचकांना व्हावी हे यामागचं मुख्य प्रयोजन आहे. तर भेटूया पंधरा दिवसांनी.

–(लेखक स्त्री अध्ययनाचे अभ्यासक आहेत)

First Published on: January 8, 2023 5:32 AM
Exit mobile version